नेरुरपारच्या ‘वसुंधरा’ ला तासकर पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : या वर्षीचा मराठी विज्ञान परिषदेचा सु. त्रिं. तासकर पुरस्कार २०२४ साठी “वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास” या संस्थेची निवड करण्यात आली आहे. .मुंबई येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. .
वसुंधरा विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील शाळांमधून विज्ञान, गणित आणि पर्यावरण विषयांच्या प्रचार व प्रसाराचे काम गेली २९ वर्षे करीत आली आहे. त्याची दखल घेऊन या वर्षीचा मराठी विज्ञान परिषदेचा सु. त्रिं. तासकर पुरस्कार २०२४ साठी “वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास” या संस्थेची निवड करण्यात आली. या पुरस्कराचे स्वरुप रूपये १ लाख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असून त्याचे वितरण मराठी विज्ञान परिषदेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान भवनात करण्यात आले. वसुंधरा संस्थेच्या वतीने कार्यवाह-विश्वस्त सतीश अंकुश नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकिय विश्वस्त अविनाश हावळ, समिती सदस्य अशोक राणे, शेखर ढवळे उपस्थित होते.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान शिक्षण क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्य करणाऱ्या संस्थेला तासकर पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्काराचे मूल्यमापन विज्ञान प्रसाराची पद्धत, समाजापर्यंत पोहोच, कामाची उपयुक्तता, कामाला मिळालेली प्रसिद्धी आणि मिळालेली मान्यता या निकषांवर करण्यात येते. यापूर्वीही वसुंधराला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विविध स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतीनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





