घागर घेऊन पाण्यासाठी कुडाळ पं स समोर उपोषण

बीडीओच्या आश्वासनानंन्तर उपोषण स्थगित

पर्यायी व्यवस्था आणि पंपधारकांवर गुन्हे दाखल होणार

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मुळदे येथील पाणी प्रश्नाबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप पर्यंत न्याय न मिळाल्याने मुळदे चव्हाणवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी घागर कळशा घेऊन कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर धडक देत आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत एलपालववाडी येथील सार्वजनिक विहिरीत लावण्यात आलेले खाजगी पंप काढण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी पंचायत समितीला दिला. दरम्यान पर्यायी पाण्याची व्यवस्था तातडीने करू आणि संबंधित पंपधारकांवर गुन्हे दाखल करू असे लेखी आश्वासन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जगताप यांनी दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील मुळदे चव्हाणवाडी जाधववाडी व एलपालवाडी या वाड्यांसाठी सार्वजनिक विहीर मंजूर झालेली आहे. मात्र या विहिरीत खाजगी पंप बसवल्यामुळे विशेषत: चव्हाणवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुळदे चव्हाणवाडी आणि जाधववाडी येथील ग्रामस्थांनी वारंवार गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पाणी प्रश्नाबाबत लक्ष वेधले होते. तातडीने हा प्रश्न सोडवून न्याय न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यावर हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी श्री जगताप यांनी दिले होते.
परंतु या आश्वासनाची सकारत्मक कार्यवाही न झाल्याने अखेर सोमवारपासून मुळदे जाधववाडी व चव्हाणवाडी येथील ग्रामस्थांनी कुडाळ पंचायत समिती कार्यालयात धडक देत पंचायत समिती कार्यालयासमोर घागरी कळशा घेऊन आमरण उपोषण सुरू केले. प्रशासन जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. माजी सरपंच गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण, संतोष जाधव, गुणवंती म्हापणकर,दर्शना जाधव मधुकर चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थ व महिलांनी या उपोषणात भाग घेतला.
दरम्यान पर्यायी पाण्याची व्यवस्था तातडीने करू आणि संबंधित पंपधारकांवर गुन्हे दाखल करू असे लेखी आश्वासन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिल्याने हे उपोषण दुपारी दोन वांजण्याच्या सुमाराला स्थगित करण्यात आले. या आंदोलनाला फुले शाहू आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्ग ने पाठिंबा दिला. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचे लक्ष वेधण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष सत्यवान साठे, सचिव रमाकांत जाधव, नागेश कदम, सूर्यकांत बिबवणेकर,तसेच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मंडळ तालुका अध्यक्ष मनोहर सरंबळकर, माजी तालुकाध्यक्ष राजन कुडाळकर, माजी सरपंच गुरुनाथ चव्हाण, पोलीस पाटील रामदास चव्हाण, यांनी चर्चेत भाग घेतला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!