अवघ्या 4 तासांत चोरीचा छडा लावत चोरट्यांना केले गजाआड

पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते यांची कौतुकास्पद कामगिरी

या तपासकामात शेर्पे पोलीस पाटील विनोद शेलार, बेर्ले पोलीस पाटील रतन राऊत यांची सतर्कता देखील ठरली महत्वाची

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील शेर्पे मुस्लिमवाडीत झालेल्या घरफोडीचा अवघ्या 4 तासांत छडा लावत दोन्ही चोरट्यांना गजाआड करण्यात कणकवली पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, खारेपाटण दुरक्षेत्रचे पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या 4 तासांत जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शेर्पे मुस्लिमवाडीत चोरट्यानि बंद घरात छप्पर आणि भिंती च्या गॅप मधून प्रवेश करत रोख रक्कम 8 हजार 500 लंपास केली होती. ही चोरी 22 एप्रिल रोजी घडली होती. कणकवली पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल होताच पीआय तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद देठे यांनी तपासाची सूत्रे हलवली.खारेपाटण दुरक्षेत्राचे पीएन उद्धव साबळे, कॉन्स्टेबल पराग मोहिते यांच्या सहकार्याने लगतच्या परिसरात माहिती घेत तपास केला असता धीरज यशवंत जाधव व राकेश यशवंत जाधव यांची संशयित म्हणून नावे समोर आली. लागलीच पीएसआय देठे यांनी साबळे, मोहिते यांच्यासह खारेपाटण तळेरे हद्दीत आरोपींचा शोध घेतला. तळेरे येथे अत्यंत शिताफीने धीरज जाधव आणि राकेश जाधव या दोन्ही चोरट्यांना चतुर्भुज केले.घरफोडीत चोरलेली रोख रक्कम 8 हजार 500 रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या चोरीच्या तपासकामात शेर्पे पोलीस पाटील विनोद शेलार, बेर्ले पोलीस पाटील रतन राऊत यांची सतर्कता महत्वाची ठरली. शेर्पे पोलीस पाटील विनोद शेलार व बेर्ले पोलीस पाटील रतन राऊत यांचे सतर्कतेमुळे दोन्ही आरोपीत यांना पकडण्यात पोलीसांना यश आल्याने त्यांच्या अतुलनीय व उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस निरीक्षक तडवी अभिनंदन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. या घरफोडी प्रकरणातील चोरट्यानी आणखी कुठे घरफोडी अथवा चोरी केली आहे अगर कसे याचा तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!