डॉक्टर नसलेली महिला कर्मचारी प्रिस्क्रीप्शन लिहीते ?

सिव्हील हाॅस्पिटलमधील संशयास्पद प्रकार
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केली चौकशीची मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा सिव्हील हॉस्पिटलमधील एक डॉक्टर नसलेली महीला कर्मचारी प्रिस्क्रीप्शन लिहून रुग्ण ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहे. याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडे काही रुग्णांच्या तक्रारी आल्या आहेत. आपण यामध्ये लक्ष घालून ताबडतोब हा प्रकार बंद करावा, अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
प्रिस्क्रीप्शन म्हणजे डाॅक्टर ज्या कागदावर पेशन्टला औषधे लिहून देतात तो कागद. हे प्रिस्क्रीप्शन डाॅक्टरनेच लिहून द्यायचे असते. ते कसे लिहायचे याचे नियम डाॅक्टरना शिकवलेले असतात. मूळात प्रिस्क्रीप्शन लिहीणे हे जोखमीचे काम असते. कारण त्यात औषधाचे नाव, त्याचा डोस, दिवसाच्या वेळा तसेच औषधाच्या कोर्सचा कालावधी वगैरे तपशील डाॅक्टरांनी त्यांच्या ज्ञानाच्या आधारे लिहायचा असतो. पण जर ही प्रिस्क्रीप्शने एखादी जीवशास्त्राचा देखील अभ्यास नसलेली व्यक्ती बिनदिक्कत लिहीत असेल तर ?
प्रिस्क्रीप्शनवरील औषधासंबंधी कोणतीही एक बाब चुकीची लिहीली गेली तर ते पेशंटच्या जीवावर बेतू शकते. पण डाॅक्टर नसलेली, वैद्यकीय क्षेत्राचे काहीही ज्ञान नसलेली, जीवशास्त्राचे काहीही ज्ञान नसलेली एक कर्मचारी व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील सिव्हील हाॅस्पिटलामध्ये अशी प्रिस्क्रीप्शने गेल्या कित्येक वर्षांपासून लिहीत असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर व्यक्ती ‘नाॅन मेडीको’ असली तरी या व्यक्तीचा सिव्हील हाॅस्पिटलच्या व्यवस्थेवर इतका दबाव आहे की, सदर व्यक्ती ज्या विभागात काम करत आहे, त्या विभागातील तिच्या कारस्थानी उद्योगांना कंटाळून अनेकजणांनी राजीनामे दिले आहेत.
तिचे पेशंटशी तुसडेपणाने वागणे तर नित्याचेच आहे. ‘सदर व्यक्ती वर्तमानपत्रात लेख लिहून स्वतःची पब्लिसीटी करते. आणि प्रत्यक्षात मात्र त्याच्या उलट वागते,’ असे पेशन्ट सांगतात.
एका पेशन्टने सांगितले की त्याचा मुलगा ‘सेरेब्रेल पाल्सी’ ने पिडीत आहे. त्याला त्यासाठी सायकाॅलाॅजिकल टेस्टिंग करून प्रमाणपत्र घ्यायचे होते. ते ही व्यक्ती करणार होती. या व्यक्तीचे ऑफीस वरच्या मजल्यावर होते. तिथे जाण्यासाठी त्यादिवशी लिफ्टची सोय नव्हती. म्हणून सदर व्यक्तीला ग्राऊंड फ्लोवरवरील एखाद्या खोलीत टेस्टिंग करून घेण्याची विनंती केली. पण सदर व्यक्तीने ती धुडकावून लावली. म्हणून पेशंटच्या वडीलांनी सदर व्यक्तीच्या वरीष्ठांकडे विनंती केली. वरीष्ठ म्हणाले, ती ऐकणार नाही. मीच तुम्हाला तुमच्या मुलाला वरच्या मजल्यावर न्यायला मदत करतो. त्या वरीष्ठ डाॅक्टरनी आणि पेशंटच्या वडीलांनी उचलून त्याला वरच्या मजल्यावर नेले.
सदर व्यक्ती व्यवस्थेतील प्राॅपर चॅनलद्वारे न जाता, आपल्या लगतच्या वरिष्ठांच्या आज्ञा न मानता सिव्हील सर्जनना डायरेक्ट भेटून विभागातील मंडळींना काम करणे मुश्किल करत असल्याची माहिती तिथे काम करणार्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
सदर व्यक्तीचे हे उपद्व्याप गेली कित्येक वर्षे सतत चालू आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर चौकशी करून या दुरवर्तनाला प्रतिबंध घालावा अशी विनंतीवजा मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसकर यांनी केली आहे.