देवगड साळशी येथील अंगणवाडी सेविकेचा प्रामाणिकपणा

हरवलेला सोन्याचा दागिना महिलेला केला परत.

देवगड तालुक्यातील साळशी येथील अंगणवाडीत सेवा बजावणाऱ्या व मुळ वारंग तुळसुली बुडक्याचीवाडी येथील रहिवाशी असलेल्या अस्मिता अशोक मेस्त्री यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्र शाळा साळशी नं.१ या प्रशालेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी रात्री साळशी नाईकवाडी येथील सुनिता नाईक यांच्या कानातील सोन्याची रिंग हरवली होती. त्यांनी घरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र दागिना सापडत नसल्याने त्या निराश झाल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शाळेच्या शेजारीच असलेल्या अंगणवाडीमधील सेविका अस्मिता मेस्त्री नेहमीप्रमाणे या मार्गाने जात असताना त्यांना शाळेच्या प्रांगणात त्यांना ती सोन्याची रिंग सापडली.
दरम्यान चौकशी केली असताना सुनिता नाईक यांची सोन्याची रिंग हरविली असल्याचे त्यांना समजले. त्याची किंमत बाजारभावानुसार १५ हजार रुपये आहे. मुख्याध्यापक गंगाधर कदम, संतोष मराठे, मदतनीस सुविधा किंजवडेकर यांच्या समक्ष अस्मिता मेस्त्री यांनी सुनिता नाईक यांचा दागिना त्यांना स्वाधीन केला. यावेळी नाईक यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

मुलाचाही असाच प्रामाणिकपणा

जून २०१३ साली शिरगाव हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असताना अस्मिता अशोक मेस्त्री यांचा मुलगा अनुराज याने दीड तोळे सोन्याची अंगठी परत करत कौतुकाची थाप मिळवली होती. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी युनियनचे माजी सहसचिव आणि साळशी हायस्कूलचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक मेस्त्री यांची सहचारिणी असलेल्या अस्मिता मेस्त्री यांचा प्रामाणिकपणा समाजात नक्कीच आदर्शवत ठरणारा आहे.

error: Content is protected !!