दारू वाहतुकीसाठी अनोखी शक्कल लढवणाऱ्या टेम्पो चालकाचा पर्दाफाश
लाखो रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे घबाड जप्त
महामार्ग वाहतूक पोलिसांची स्तुत्य कारवाई
टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
गोव्याहून चिपळूण ला जाणाऱ्या मालवाहू टेम्पोमध्ये लाखो रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे घबाड सापडून आले. ही कारवाई आज दुपारी महामार्ग वाहतूक पोलिसांनी ओसरगाव टोल नाक्याजवळ केली. यात महामार्ग वाहतूक मदत केंद्र ओसरगाव येथील पोलीस सुमित चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या टेम्पो चालकाची चलाखी पकडली गेली. किराणा मालाची वाहतूक करणारा हा टेम्पो चालक गणेश गजानन काळसेकर (24 निरवडे सावंतवाडी) हा गोव्याहून चिपळूणच्या दिशेने जात होता. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र ओसरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांनी दिली. ओसरगाव टोल नाक्याजवळील कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांना या टेम्पो चालकावर संशय आला. म्हणून त्यांनी कागदपत्र तपासणीसाठी गाडी थांबवली. गाडीच्या मागील भागात किरकोळ साहित्य असताना टायर दबलेल्या स्थितीत व गाडी हेलकावे खात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी टेम्पो चालकाला थांबवून त्याच्याकडे विचारणा केली. यावेळी टेम्पो चालकाने टेम्पोच्या मागील भागात दारू लपवण्यासाठी चालकाच्या सीटच्या व मागील हवद्याच्या मधील भागात एक कप्पा करत चोरटी दारू वाहतूक करण्याची शक्कल लढवल्याचे निदर्शनास आले. टेम्पोच्या टपामध्ये देखील त्या चालकाने एक कप्पा केला होता. या दोन्ही कप्प्यामध्ये मिळून 750 मिली मापाचे तब्बल 60 बॉक्स असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी चालकाला टेम्पो सह ताब्यात घेत कणकवली पोलिसात आणले. या घटने संदर्भात वाहतूक पोलीस सुमित चव्हाण हे फिर्याद दाखल करत असून, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक, हवालदार सुनील वेंगुर्लेकर कॅलीस डिसोजा, देवेंद्र जाधव, आदी या कारवाईदरम्यान उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली