मानव साधन संस्थेतर्फे. आरवली येथे लवकरच “जलक्रीडा प्रशिक्षण रोजगार”प्रमाणपत्र वाटप

आरवली (वेंगुर्ला) – मानव साधन विकास संस्था’ ही कोकणातील एक नामांकित सामाजिक संस्था. सन्माननीय श्री. सुरेश प्रभू संस्थापक अध्यक्ष असलेल्या व सद्यस्थित अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रमांचा फायदा आतापर्यत कोकणातील लाखो लाभार्थ्यांना मिळाला आहे.
गेल्या २५ वर्षांत मानव साधन विकास संस्थेने सिंधुदूर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांतील ९०,००० हून जास्त गरजूंना ‘जन शिक्षण संस्थान’(देशातील पहिले ग्रामीण जनशिक्षण संस्था), ‘उद्योजकता विकास संस्था’( नवी मुंबईतील वंचित कामगारांच्या पाल्यांकरीता), ‘स्कूल आॅफ नर्सिंग’( सिंधुदुर्ग मधील पहिले नर्सिंग स्कूल), ‘परिवर्तन केंद्र’प्रकल्प, इत्यादींच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत प्रशिक्षित केले आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विशेष उदाहरण म्हणजे संस्थेमार्फत १२ वर्षांपूर्वी दिलेल्या वाॅटरस्पोर्टस् प्रशिक्षणाचा फायदा करून घेत आज मालवण (सिंधुदूर्ग) तालुक्यातील मच्छिमार युवक पर्यटन क्षेत्रात यशस्वीपणे करोडोंची उलाढाल करीत आहेत, त्यातूनच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिकांना उद्योग व रोजगार निर्माण झाला आहे.
मानव साधन विकास संस्था ही महिला, शेतकरी, मच्छिमार, युवा, माजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिंगत होणारे पर्यटनमुल्य लक्षात घेवून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित, परिवर्तन केंद्र प्रकल्प, सिंधुदूर्ग आणि ‘आय. सी.आय. सी. आय. फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रकल्प सिंधुपुत्र’ हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम आॅक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत ‘लाईफ सेव्हिंग टेक्निक्स्-वाॅटर स्पोर्टस्’ व
पाॅवर बोट हॅन्डलिंग (टिलर)’ संबंधीत, निवडक ८७ मच्छिमार युवकांना प्रशिक्षण दिले गेले.
सदरचे प्रशिक्षण भारतातील नामांकित ‘भारतीय पर्यटन अाणि यात्रा प्रबंध संस्थान’ अंतर्गत ‘राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा’ या पर्यटन मंत्रालय, भारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये दिले गेले. महत्वाची बाब म्हणजे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १० सिंधुकन्यांनी प्रथमच सदरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड हे तालुके वाॅटरस्पोर्टस् व्यवसायासाठी पोषक आहेत.
सहकारातून वाॅटर स्पोर्टस क्षेत्रात रोजगार निर्मिती सहज शक्य आहे हे ओळखून संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व वाॅटर स्पोर्टस परवाना वितरणाच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. लवकरच आरवली-सागरतिर्थ येथील ‘आराकिला’ या पंचतारांकित रिसाॅर्ट वर राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेश प्रभू, पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण, नाबार्डचे अध्यक्ष श्री. शाजी के.व्ही., आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. संजय दत्ता, सी.आय.आय. चे डाॅ. राजेश कपुर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!