वरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरवडे मधील “त्या” तरुणावरही गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांकडून दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू

रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक (मूळ वरवडे मुस्लिमवाडी) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून भाजपा पदाधिकाऱ्यांनी लाकडाने तसेच हाताच्या ठोशानी मारहाण केल्याची फिर्याद आसिफ शेख याने कणकवली पोलीस ठाण्यात 25 जानेवारी रोजी दाखल केली. तर आसिफ शेख याने भाजपा पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची फिर्याद भाजपा पदाधिकारी पपू पुजारे याने दाखल केली आहे. आसिफ शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत, माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, आशिये सरपंच महेश गुरव, वरवडे उपसरपंच अमोल बोन्द्रे, वरवडे तंटामुक्त समिती अध्यक्ष हनुमंत बोन्द्रे, निलेश देसाई, महेश कदम, रोहित ठाकूर, विजय इंगळे, पपु यादव 15 ते 20 जणांच्या समूहाने आसिफ याच्या घरात घुसुन त्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार सर्व संशयितांवर भादवी कलम 324, 297 ए, 504,143, 149 आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, तर पपू पुजारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सलमान शेख याने वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवून आणि आसिफ शेख याने धार्मिक कमेंट करून धार्मिक तेढ निर्माण केली तसेच शेख याने लाकडी दांड्याने राजेश उर्फ सोनू सावंत, पपू पुजारे याना मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार आसिफ शेख याच्यावर आयपीसी 295 ए, 324, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!