प्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक: श्रीमंत खेम सावंत भोसले
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिखरे गाठणाऱ्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या नररत्नांची स्मृतिचित्रे ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथामार्फत सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक काम प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले आहे. या ग्रंथामुळे अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्याला पुन्हा भेटणार आहेत, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी आज केले.
सावंतवाडी येथील राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या ‘सिंधुरत्ने’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. युवराज लखम सावंत भोसले यांच्या उपस्थितीत आज शिवजयंतीदिनाचे औचित्य साधुन प्रा. डॉ. लळीत यांच्या ‘सिंधुरत्ने’ (भाग एक) या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, लेखिका व कवयित्री डॉक्टर सई लळीत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. लळीत यांनी सिंधुरत्ने या ग्रंथाची संकल्पना विशद केली.
श्रीमंत खेम सावंत भोसले म्हणाले की, आजचे जग वेगवान आणि गतिमान झाले आहे. सगळ्या संकल्पना बदलत आहेत. मात्र आपण ज्यांच्या पुण्याईवर पुढे आलो आणि उभे आहोत, अशा ज्येष्ठश्रेष्ठांचे स्मरण करणे आवश्यक आहे. कालौघात अशी ज्येष्ठ नावे विस्मृतीत जातात. त्यांची ओळख नव्या पिढीला करुन देण्याचा ‘सिंधूरत्ने’ या ग्रंथमालेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढील उर्वरित सहा खंडांची आपण आतुरतेने वाट पाहू आणि त्यांना स्वतःच्या ग्रंथसंग्रहालयात स्थान देऊ, असे त्यांनी आवर्जून सांगितले. युवराज लखम सावंत भोसले यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. लळीत म्हणाले की, सिंधुदुर्गातील अनेक व्यक्ती साहित्य, संगीत, नाटक, लोककला, अभिनय, चित्रकला, शिल्पकला, खेळ, याशिवाय विविध ज्ञानक्षेत्रे, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात उच्च पदावर गेल्या. अशा सिंधुरत्नांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुरत्ने ही ग्रंथमाला प्रकाशित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सिंधुदुर्ग भूमीत जमलेली असंख्य रत्ने काळाच्या विशाल पटावर काही स्मरणात राहिली तर काही विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचा परिचय व्हावा, या हेतूने ही नवी ग्रंथमाला काढण्यात येत आहे. पहिल्या भागात ४९ सिंधूरत्नांचा परिचय करून देण्यात आला आहे. यामध्ये सावंतवाडी संस्थानचे अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज, आरोंद्याचे राघोराम पागे रांगणेकर, कुडाळचे राम प्रभावळकर, संगीत शिक्षक गंगाधर आचरेकर, गायक नट भार्गवराम आचरेकर, शिक्षण महर्षी मनोहर जांभेकर, नटवर्य गणपतराव लळीत, चित्रकार आर के मालवणकर, प्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड, गोविंदराव माजगावकर, बाबी नालंग, गुणवंत मांजरेकर, मच्छिंद्र कांबळी, ज. र. आजगावकर, का. र. मित्र, वि. वा. हडप, ग. त्र्यं. माडखोलकर, आरती प्रभू, आ. ना. पेडणेकर, सिद्धार्थ तांबे, गुं. फ. आजगावकर, बालसन्मित्रकार पा. ना. मिसाळ, रावबहादुर वासुदेव बांबर्डेकर अशा ४९ व्यक्तींचा समावेश आहे.
पुणे येथील अक्षरधन प्रकाशनने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. २१६ पृष्ठांच्या या ग्रंथांची किंमत २३० रुपये आहे. ज्यांना हा ग्रंथ हवा असेल त्यांना तो 7709205050 या क्रमांकावर युपीआय केल्यास २३० रुपये सवलतीत घरपोच उपलब्ध होईल. या ग्रंथमालेतील दुसरा खंड एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. एकुण सात खंडांतून ३५० व्यक्तींचा परिचय करुन दिला जाणार आहे.
श्रीमंत खेम सावंत भोसले व लखम राजे सावंत भोसले यांचे स्वागत श्री. सतीश लळीत यांनी गुलाबपुष्प बकुळीचा हार आणि शाल देऊन केले. डॉ. सई लळीत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉ. सुश्रुत लळीत यांनी केले.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी