कणकवली स्थानकात धुळीच्या प्रदुषणासह प्लॅस्टिक जाळण्या मुळे वाढ

प्रवाशी हैराण- नगरपंचायत कचरा नेत नसल्याची तक्रार – भाई चव्हाण
कणकवली:-नेहमी गजबजलेल्या कणकवली बस स्थानकात प्रवाशांना धुळीच्या प्रदुषणाचा सामना करणे हे नित्याचे झाले आहे. पण अलिकडे स्थानकात जमा होणारा प्लॅस्टिकसह सर्वं प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रदुषणात कमालीची वाढ होत आहे. त्याचे दुष्परिणामही प्रवाशांना भोगावे लागत आहेत. हा विळखा रोखण्यासाठी कणकवली नगरपरिषदेने असा कचरा गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मध्यवर्ती कणकवली बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या रिकाम्या प्लॅस्टिक पिशव्यांची संख्या स्थानकात मोठी असते. हा सर्वं कचरा सफाई कामगार स्थानकाच्या मागिल बाजूस जमा करतात. मात्र नगरपंचायतीच्या कचरा गाड्या तो गोळा करण्यासाठी अभावानेच येतात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, शेवटी कचर्याचे मोठे ढीग जमा झाल्यावर सफाई कामगार नाविलाजास्तव त्याना आगी लावतात. सबब प्लॅस्टिक जाळण्यामुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्याचा अप्रत्यक्ष त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे. एसटी आणि नगरपरिषद प्रशासनाने हे प्रदुषण रोखण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे.