अखेर कणकवली मधील जमिनीचे दलाल जनते समोर!

माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी संदेश पारकर यांच्यासोबत गद्दारी केली
माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचा नलावडे, हर्णे यांना टोला
नगराध्यक्ष राहिलेल्या समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांच्यावर वैयक्तीत आरोप करून राजकारणाची पातळी घसरवणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पदाची किंमत राखली पाहिजे. शहर विकास आराखडयाबाबत सुशांत नाईक यांनी केलेले आरोप हे योग्यच आहेत. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मानतील ती भावना आहे. शहर विकास आराखडा जनतेपासून का लपवला जातोय आणि तो जनतेसमोर कधी आणणार यांचे उत्तर नलावडे आणि हर्णे यांनी का दिले नाही? सुशांत नाईक यांनी कोणत्याही जमीन दलालांची नावे घेतली नव्हती परंतु चोराच्या मनात चांदणे असल्याने बाबूवर टीका करण्यासाठी कणकवलीतील तीन अति विद्वान लोकांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून कणकवलीतील जमिनीचे दलाल कोण आहेत हे जनतेसमोर आले आहे. असा टोला माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.
रुपेश नार्वेकर पुढे म्हणाले, सुशांत नाईक यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्याऐवजी समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी केवळ वैयक्तिक टीका करण्याचे काम केले. समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांच्याबरोबर कशाप्रकारे गद्दारी केली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे गद्दारी केलेल्यांनी निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करू नये. आ. वैभव नाईक यांच्या कामावर कुडाळ मालवणची जनता समाधानी आहे. अनेक चौकशा लागल्या तरी आ. वैभव नाईक पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे राणेंनी आ. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी कणकवलीतील भाडोत्री लोक ठेवले आहेत का? असा सवाल रुपेश नार्वेकर यांनी केला आहे.
कणकवली प्रतिनिधी