नागवे रेशन दुकानावर प्लास्टिक तांदूळ आढळल्याची तक्रार!

तांदूळ प्लास्टिकचे नाहीत तर पोषणयुक्त तहसीलदारांची माहिती
शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांनी दिले निवेदन
नागवे रेशन दुकान मध्ये सध्या आलेल्या धान्य वितरण करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आल्याचे दिसत असल्याची तक्रार नागवे शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र हे तांदूळ प्लॅस्टिकचे नसून, खाण्यायोग्य आहेत व शासन योजनेनुसार पोषण युक्त तांदूळ असल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. श्री सांगवेकर यांनी या निवेदनात म्हटले आहे, सदरील तांदूळ पाण्यात टाकला असता त पाण्यावरती तरंगत आहे. तसेच हा तांदूळ धुण्यासाठी पाण्यात टाकल्यानंतर पाण्यावरती तेलकट असा तवंग पसरतो. असा हा तांदूळ खाण्यासाठी योग्य नाही. आणि हा जर तांदूळ चांगला प्रकरचा असेल तर त्याची आपणाकडून लेखी स्वरुपात आम्हाला हमी द्यावी. सदरील तांदळाच्या गुणवत्तेचा बोर्ड फलक लावणे आहे. याबाबतची चौकशी करून चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी श्री सांगवेकर यांनी केली आहे. या निवेदनादरम्यान चर्चा करताना श्री देशपांडे यांनी सदर तांदूळ हा पोषक युक्त तांदुळ असून, शासन योजने या तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे कार्डधारक किंवा जनतेने याबाबत गैरसमज करून घेऊ नये. सदरचे तांदूळ हे खाण्यास योग्य आहेत. व याबाबत कार्डधारक व जनतेला रेशनिंग दुकानावर माहिती देण्याबाबत रेशन दुकांनदारांना सूचना देण्यात येतील अशी माहिती श्री देशपांडे यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, निलेश तेली आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर, कणकवली





