समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना – अजय आकेरकर
बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजचे एनएसएस श्रमसंस्कार शिबीर सुरु
पिंगुळी सरपंच अजय आकरेकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन
प्रतिनिधी । कुडाळ : समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. समाजामधील सद्यस्थितीतील ओळख ही राष्ट्रीय सेवा योजनेत काम करण्यातून होते आणि आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा कस राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरातून लागतो. असे प्रतिपादन पिंगुळी गावचे सरपंच अजय आकेरकर यांनी काढले, ते बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत घेण्यात आलेल्या निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री. उमेश गाळवणकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. राघोबा धुरी, कृषी विस्तार अधिकारी श्री. संजय ओरोस्कर, ग्रामसेवक श्री वैभव सावंत, सौ. मीना जोशी प्राचार्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, सौ कल्पना भंडारी उपप्राचार्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय तसेच फ़िजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण मर्गज व पिंगुळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. परुळेकर इत्यादी उपस्थित होते.
दीप प्रज्ज्वलन व संत गाडगे महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजय आकेरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि तडजोड याचा असलेला सहसंबंध उपस्थितांसमोर कथन केला व सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा यशस्वीतेसाठी पिंगुळी ग्रामपंचायत, पिंगुळी ग्रामस्थ हे सर्वतोपरी सहकार्य करतील असे अभिवचन देत शिबिरास शुभेच्छा दिल्या. शिबिराला शुभेच्छा देताना उमेश गाळवणकर यांनी मोलाचा सल्ला देत म्हणाले की” फळाची अपेक्षा न करता केलेल्या कामाची नोंद समाजमनात होत असते व त्याचे सकारात्मक परिणाम आयुष्यात मिळत असतात. शिबिराच्या निमित्ताने समाजात मिसळण्याची सुसंधी मिळाली आहे. त्याचा स्वतःच्या विकासासाठी वापर करा. असे सांगत समाजभान जपणारा एक आदर्श म्हणून पिंगुळी सरपंचांच्या जीवनात डोकावल्यानंतर सामाजिक विकासाची तळमळ काय असते हे कळून येईल .असे सांगितले व ग्रामीण समाजातील सुखदुःख वेदना समजून घ्या असे सांगून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मर्गज तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी धुरी हिने केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे एनएसएस ऑफिसर सौ वैशाली ओटवणेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
दिनांक १४/०२/३०२३ ते २०/०२/३०२३ या कालावधीत या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे आयोजन करण्यात आले असून या कालावधी प्राथमिक शाळा परिसर स्वच्छता, सार्वजनिक वास्तु परिसर स्वच्छता, रस्ते सफाई, बंधारे बांधणे ,धार्मिक स्थळांची स्वच्छता अशा उपक्रमाबरोबरच विविध विषयांवर बौद्धिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.