नेपाळी येती दारा तोची बागायतदारांचा दिवाळी दसरा – भाई चव्हाण

कणकवली- महाराष्ट्रातील मोलमजुरी करणार्यांची संख्या अगणित आहे. तरीही परराज्यांतील, परदेशांतील मजूरांशिवाय महाराष्ट्रातील रहाटगाडगे चालू शकत नाही. त्यामुळेच कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना त्यांच्या बागांतून चांगले उत्पन्न मिळावे म्हणून परराज्यांतील, परदेशांतील मजूरांवर अवलंबून रहावे लागत आहे. विशेषतः नेपाळी मजूर मिळविणे म्हणजे बागायतदारांचा परमोच्च आनंदाचा क्षण असतो. “नेपाळी येती दारा
तोची बागायतदारांचा दिवाळी दसरा”अशी परिस्थिती कोकणातील आंबा, काजू आदी बागायतदारांची झाली आहे, असे निरिक्षण कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नोंदविले आहे.

सद्या कोकणात हिवाळी ॠतूची चाहूल लागताच हापूस आंबा, काजू आदीं बागायतदारांच्या पोटात गोळा यायला सुरुवात होते. कारण विशेषतः कोकणातील कातळ जमिनीवर‌ हापूस आंब्याच्या बागायती निर्माण करणे हे खूप कष्टाचे, जिकिरीचे, खर्चिक काम असते, असे‌ स्पष्ट करून चव्हाण म्हणतात, हिवाळीच्या हंगामात बागायतदारांना हापूस आंब्यापासून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी खते, औषध फवारणी, मोहराची देखभाल आदीं कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजूरांची गरज असते. मात्र स्थानिक मजूरांची अनुत्सुकतता, अडवणूक , दिवसाला खाण्यापिण्यासह किमान रुपये ५०० मजूरी, कामाच्या अनियमित वेळा आदी कारणांमुळे बागायतदारांना बिहार, उत्तर प्रदेश, नेपाल आदी ठिकाणांंहून येणार्या मजूरांची आत्यंतिक गरज असते.

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यांतील‌ मजूरांसह सद्या नेपाळहून रोजीरोटीसाठी कोकणात येणार्या मजूरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नेपाळहून चार‌ पाच दिवसांचा प्रवास करुन ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांत उतरतात. तेथून ते नजिकच्या एसटी बस‌ स्थानकांत येऊन मुकादमांच्या सूचनेनुसार हापूस आंबा, काजू आदीं बागायतदारांच्या गावांतील बागांमध्ये पोहचतात. त्यामुळेच अशा बागायतदारांना ” नेपाळी येती दारा…तोची बागायतदारांचा दिवाळी दसरा”अशी आनंदाची लाट निर्माण‌ होत आहे.

या संदर्भात चव्हाण यांनी कणकवली बस स्थानकात आलेल्या नेपाळी मजूरांशी चर्चा केली. त्यावेळी नेपाळ मधिल‌ बहुसंख्य नागरिक नेपाळमध्ये शिक्षणाची पदवी आदी पर्यंत सोय असतानाही आत्यंतिक गरीबीमुळे ते सातवी पर्यंत शाळा सोडतात. कुटुंबियांना आर्थिक हातभार लागावा म्हणून मोलमजुरीची कामे करायला सुरुवात करतात.‌ पण तिथे मजूरीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने नेपाळ सोडून भारतातील अन्य राज्यांची वाट धरतात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, आपल्याकडे स्थानिक मजूर अडवणूक करण्याचे पाऊल उचलतात. सणासुदीची आदी कारणे सांगून दांड्या मारतात. मात्र बागायतदार नेपाळी मजूरांच्या रहाण्यासह खान्यापिण्याची सोय, किमान‌ महिना‌ रुपये १२ हजार‌ पगार देत असल्याने समाधानी असतात. त्यामुळे तो जून अखेर पर्यंत बागायतदारांना रात्री अपरात्री केव्हाही काम करण्यास तयार असतो.

error: Content is protected !!