फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांना समाविष्ट होण्यासाठी मुदत वाढ द्या!

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
कृषिमंत्र्यांचे मुदतवाढ देण्याचे अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश
सिंधुदुर्गातील अर्थकारण हे काजू आंबा पिकावर अवलंबून आहे. फळपीक विमा योजनेच्या नोंदणीची 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून मागील 8 ते 10 दिवस सर्व्हर प्रॉब्लेम मुळे फळपीक विमा योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे फळपीक विमा योजना नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर ऐवजी 15 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, गणेश चौगुले उपस्थित होते. अबिद नाईक यांच्याशी याबाबत कृषिमंत्री मुंडे यांनी सविस्तर चर्चा करत सिंधुदुर्गातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी अबिद नाईक यांनी फळपीक विमा नुकसानभरपाई ची रक्कम अद्याप फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नसल्याकडेही कृषिमंत्री मुंडे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी खात्याच्या सचिवांना तात्काळ फळपीक विमा नोंदणी ची 30 नोव्हेंबर असलेली अंतिम मुदत 15 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्याचे निर्देश दिले. याचा लाभ सिंधुदुर्गसह कोकणातील सर्व फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
कणकवली, प्रतिनिधी





