राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

सभेनंतर सेन्सॉर बोर्ड सदस्यांशी रंगकर्मीसोबत खुल्या चर्चेचे आयोजन
ब्युरो । कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पं स च्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची सभा पहिल्यांदाच होत आहे. सभेनंतर जिल्हयांतील रंगकर्मींना सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांशी संवाद साधता येणार आहे. अशी माहिती परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य विजय चव्हाण यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना विजय चव्हाण म्हणाले, राज्यात अथवा देशात मराठी भाषेतून रंगभूमीवर सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता वाचन करून त्याचे परीक्षण करून त्याला परवानगी देण्याचे काम हे मंडळ करते. रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिगगजांची निवड या समितीवर केली जाते. या बैठकीला शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळाचे सचिव संतोष खामकर हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिलीप वाघमारे, दत्तात्रय कुंभार, संतोष साठे हे शासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या मंडळाची सभा यापूर्वी मुबंई, पूणे, नागपूर, अश्या ठिकाणी होत होती. परंतु सिंधुदुर्ग हे सांस्कृतिक चळवळीचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे या मंडळाची सभा आपल्या सिंधुदुर्ग मध्ये व्हावी जेणेकरून महाराष्ट्रातील दिग्गज एकाच वेळी आपल्या जिल्हात येतील. त्यामुळे कणकवली येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज रंगकर्मी यांचेसोबत सिंधुदुर्ग मधील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लोककलाकार यांच्यामध्ये संवाद घडावा, सिंधुदुर्गमधील रंगभूमी आणि सांस्कृतिक चळवळ याबाबत सर्वंकष चर्चा व्हावी, संवाद घडावा या हेतूने सकाळच्या सत्रात मंडळाची सभा संपलेवर दुपारी २.३० तें ४.३० या वेळात पंचायत समिती कणकवलीच्या सभागृहात सिंधुदुर्ग मधील रंगकर्मी, नाट्यसंस्था प्रतिनिधी, लोकाकलाकार यांचा संवाद व चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन विजय चव्हाण यांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर उपस्थित होते.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली.





