पलटवार । संध्याताई, धिंड काढणे हीच तुमची संस्कृती !

जान्हवी सावंत यांच्यामागे जिल्ह्यातील महिला आणि शिवसेना भक्कम

शिवराळ भाषा प्रकरणी उबाठा महिला आघाडी जान्हवी सावंत यांच्या पाठीशी

निलेश जोशी । कुडाळ : धिंड काढणे हीच तुमची संस्कृती आहे. मोदींच्या भाजप-संघामध्ये धिंड काढणे, अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, हीच तुमची संस्कृती आहे. जान्हवी सावंत यांची धिंड काढणार म्हणता तर पहिली धींड तुमच्या भाजपच्या राज्यातल्या महिला आघाडीची काढा. तपासा त्या काय बोलतात? त्यामुळे भाजपच्या लोकांनी कसेही बोलावे आणि विरोधकानी सभ्यता पाळावी ही पद्धत आम्हाला शिकवू नका. जान्हवी सावंत यांच्या मागे जिल्ह्यातील महिला आघाडी आणि शिवसेना कार्यकर्ते भक्कमपणे उभे आहेत. 2024 ला जनताच तुमच्या थापा आणि फसव्या विकासाची धिंड काढणार आहे हे विसरू नका. अशा शब्दात उबाठा सेनेच्या महिला आघाडीने भाजप महिला आघाडीवर पलटवार केला आहे.
उबाठाच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या शिवराळ भाषेतील उल्लेखाबद्दल भाजप महिला आघाडीने संताप व्यक्त करून जान्हवी सावंत यांनी माफी मागावी अन्यथा धिंड काढू असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यावर उबाठा सेने महिला आघाडीच्या कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे, तालुका संघटक स्नेहा दळवी आणि मथुरा राऊळ यांनी पत्रक काढून भाजपवर पलटवार केला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संध्याताई (आम्ही ताईच म्हणणार कारण ती आमची संस्कृती आहे आणि तुमच्याकडून आदराची अपेक्षा ही नाही आणी गरजही नाही). धिंड काढणे हीच तुमची संस्कृती. मोदींच्या भाजप-संघामध्ये धिंड काढणे, अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, हीच तुमची संस्कृती आहे. जान्हवी सावंत यांची धिंड काढणार म्हणता तर पहिली धींड तुमच्या भाजपच्या राज्यातल्या महिला आघाडीची काढा. तपासा त्या काय बोलतात? तुमच्या राज्यात मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते आधी अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांची धिंड काढा ! महिला खेळाडूंचे शोषण करणाऱ्या तुमच्या पक्षाच्या खासदाराची धिंड काढा. बिल्कीस बानू प्रकरणात ज्या बलात्काऱ्यांचा सत्कार केला गेला हिम्मत असेल तर त्यांची धिंड काढा. या सर्व प्रकरणावर माननीय पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. .
महिला आरक्षण हे जे गाजर दाखवले आहे ते जनगणना होणार, मग मतदारसंघ पुनर्रचना होणार मग, मग मतदारसंघ वाढणार आणि मग ते अस्तित्वात येणार म्हणजे २०३४ पर्यंत ते प्रत्यक्ष अस्तित्वात येईल असे वाटत नाही. संसदेच्या उद्घाटनाला महिला राष्ट्रपतीना आमंत्रण दिलं जात नाही ही तुमच्यासाठी शरमेची बाब आहे. यावर बोला. तेव्हा का गप्प बसता? तेव्हा का नाही पत्रकार परीषद घेत? महीलाशक्ती , मातृशक्तीचा जेव्हा खरा अपमान होतो, तेव्हा का नाही बोलत? शेतकऱ्यांना 12 हजार देऊन काय उपकार करता? दिल्लीत हजारो शेतकरी आपल्या मागण्यासाठी भांडत होते. मरत होते. त्यावेळी अदानीच्या दावणीला बांधलेल्या केंद्र सरकारने त्यांच्या किती मागण्या मान्य केल्या? महाराष्ट्रातल्या गेल्यावर्षीच्या पीक विम्याचे पैसे आधी द्या.
तुमची तुमच्या राजकीय सोयी नुसार दैवतं बदलत असतात. 2016 मध्ये तुम्हाला जेव्हा मोदींचं वावडं होतं आणि राहुल गांधी तुमचे नेते होते तेव्हा कुडाळ नगरपंचायत मध्ये याच मोदींचा ते पंतप्रधान असूनही फोटो लावायला तुम्हीच नकार दिला होता. .
जान्हवी सावंत यांना सुषमा अंधारे व्हायची गरज नाही. त्या २०१२ पासून भाषण करत आहेत. अंधारे मॅडम आता सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. शिवाय जान्हवी ताई भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आजच्या सर्व सामान्यांच्या आर्थिक परिस्थिती वरील चीड यातून बोलल्या, तुम्ही कसं ठरवलं त्या नेमक्या कोणाबद्दल बोलल्या? तुमचे पाहिले आदर्श राणे साहेब हे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना थोबाडीत मारायची भाषा वापरतात आणि त्यांची दोन मुलं नेहमी उर्मट भाषेत बोलतात, प्रत्येक व्यक्तीचा एकेरी भाषेत उल्लेख करतात. दुसऱ्यांना सभ्यतेची भाषा शिकवताना आपल्या पक्षात ही डोकावून पाहा. दुसऱ्याकडे एक बोट करताना चार बोटं आपल्याकडेही असतात. तुमच्या नेत्यांनी तर दिल्लीत जाऊन सिधूदुर्गची लाज घालवली . ती चालते का?
आणि त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच म्हणाल तर त्यांच्या सासूबाई दोन महिने एडमिट होत्या, आणि त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग दाखवला नाही. शिवाय स्थानिक निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर नव्हती, सहभाग दाखवला असता तर चित्र नक्कीच वेगळं असत, एवढं निश्चितच. मागील खेपेस त्यांनी ती ग्रामपंचायत जिंकूनही दाखवली होती.
त्यामुळे भाजपच्या लोकांनी कसेही बोलावे आणि विरोधकानी सभ्यता पाळावी ही पद्धत आम्हाला शिकवू नका. जान्हवी सावंत यांच्या मागे जिल्ह्यातील महिला आघाडी आणि शिवसेना कार्यकर्ते भक्कमपणे उभे आहेत. 2024 ला जनताच तुमच्या थापा आणि फसव्या विकासाची धिंड काढणार आहे हे विसरू नका, असा पलटवार उबाठा सेनेच्या महिला आघाडीने केला आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!