बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची बहारदार ‘स्वरसंध्या’

दीपावली स्पेशल सुरमयी कार्यक्रमातून चढविला स्वरसाज.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सहकार्य
प्रतिनिधी । कुडाळ : दीपावलीचे औचित्य साधून बॅरिस्टर शिक्षण संस्थेच्या गायक कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांच्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या सहकार्यांने श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये हि स्वरमैफिल रंगली.
संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था ही शैक्षणिक उन्नती ,सामाजिक बांधिलकी बरोबरच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कारांसाठी सुप्रसिद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सचिन कुडतडकर, महेश तळगावकर, व मयूर पिंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील बाल गीत गायक व युवा विद्यार्थी गायक, शिक्षक यांच्या गीत गायन अदाकारीने रसिकांकांची मन जिंकणारा स्वरसंध्या कार्यक्रम लक्षवेधी ठरला. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळच्या आग्रहाने सदर संस्थेच्या सर्व वयोगटातील गायक कलाकारांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भक्ती गीत, भावगीत, अभंग, भारुड अशा विविध गीत प्रकारातील बहारदार गीतं स्वरसंध्या कार्यक्रमात सादर केली. प्रफुल्ल वालावलकर, महेश कुडाळकर, उमेश गाळवणकर , किशोर काणेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी सुरेशं राऊळ, विलास बाक्रे,सुंदर गाळवणकर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. योगिता शिरसाट-तिळवे यांच्या प्रसंगोचित, सुरेल सूत्रसंचालनाने अधिकच बहारदार ठरलेल्या या स्वरसंध्या कार्यक्रमांमध्ये पुढील विविध गीतं रसिकांची दाद देऊन गेली.. लटपट लटपट तुझं चालणं (सौम्य नाईक),अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ( नचिकेत देसाई) यांनी गायिलेले गीत ,जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले , बगळ्यांची माळ फुले ही संकेत पाटकर ने गायिलेली गीतं, तसेच एका तळ्यात होती बदके पिले सुरेख – (संस्कृती सामंत), निशाणा तुला दिसला ना – (साईलीन वारंग)’,निजरूप दाखवा ओ (योगिता शिरसाट,) लक्षदीप हे उजळले घरी दारी – (सानवी खवणेकर), गगन सदन तेजोमय…,आली माझ्या घरी ही दिवाळी (-ऋचा कशाळीकर), हे चांदणे फुलांनी (प्राची केरकर), आई दर्शन घेईन मी (शमिका नाईक) यांनी गायलेली गाणी रसिकांच्या मनावर भूरळ घालणारी ठरली. याव्यतिरिक्त , धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना (संकेत पाटकर व ऋचा कशाळीकर), चंद्रभागेच्या तीरी (संकेत पाटकर), देहाची तिजोरी (सिया देसाई), पांडुरंग नामी लागलासे ध्यास, ऐरणीच्या देवा (ऋचा कशाळीकर) अशी भावगीत, भक्तीगीते आणि या या शेजारणीने बरं केलं नाही ग बया हे कश्यपी तांबे ने गायिलेले भारूड रसिकांची दाद घेऊन गेले.
याबरोबरच सचिन कुडतडकर, महेश तळगावकर मयुर पिंगुळकर,रजत गाळवणकर, युवराज माधव,भार्गव चव्हाण,अक्षय साळगावकर यांच्या उत्तम संगीत साथीने कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. विशेष म्हणजे स्वरसंध्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक कलाकारांचा व वाद्यवृदांचा श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
.एकूण या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, डॉ.व्यंकटेश भंडारी, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक वृंद, कर्मचारी तसेच कलाशिक्षक प्रसाद कानडे, श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला रसिक श्रोते, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.