मराठा समाजातर्फे बाईक रॅली काढून मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सावंतवाडी दाखवली एकजूट

आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत सावंतवाडी तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन

एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार घोषणांनी सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरासह संपूर्ण शहर दुमदुमून निघाले. सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे बाईक रॅली काढून मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘ एल्गार ‘ केला.

सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे श्री देव पाटेकर चरणी श्रीफळ अर्पण करून बाईक रॅलीला प्रारंभ झाला. राजवाडा येथे या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिलाध्यक्षा अर्चना घारे- परब, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, उबाठा सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, महिला आघाडीच्या अपर्णा कोठावळे, मनसेचे सुधीर राऊळ तसेच मराठा समाजातील सर्व पक्षातील नेत्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.

सावंतवाडी शहरात दाखल झालेले सावंतवाडी तालुक्यातील मराठा बांधव भगवा ध्वज लावलेल्या दुचाकी ‘जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत होते. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि त्यानंतर थेट सावंतवाडी तहसीलदार कार्यालय या परिसरात मराठा बांधव दाखल झाले. आपल्या मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना आपले निवेदन सादर केले. या बाईक रॅलीने उपस्थितांचे लक्ष तर वेधले. अत्यंत शांत, संयमी व शिस्तबद्धपणे ही रॅली पार पडली. त्याबद्दल सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व हीच एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन केले.

सावंतवाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!