एस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

15 ऑक्टोबर हा दिवस थोर संशोधक, लेखक ,भारताचे अकरावे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती. हा दिवस देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून एस एम ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कॉलेजचे प्राचार्य श्री जी एन बोडके यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक करताना, विद्यार्थ्यांनी वाचन आणि प्रेरणा या दोन शब्दांचा मतितार्थ समजला तरी आपल्या आयुष्यात आपण वाचनाने समृद्ध होऊ असे मत श्री सी.डी. हिर्लेकर यांनी व्यक्त केले. सानवी भालेकर, पूर्वा घाडी या विद्यार्थिनींनी वाचनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थी दशेत वाचन का महत्वाचे आहे याचे स्वानुभव सांगितले. पार्थ सावंत याने बुलढाण्याच्या वाचनवेड्या मोईन ह्युमॅनिस्ट याच्या वाचनाचा प्रवास सांगताना व्यसनाच्या आहारी गेलेला मोईन वाचनाने आज स्वतःचे वेगळे कर्तृत्व कसे सिद्ध करू शकला याचे सुंदर वर्णन केले.
सौ एम आर पाटील यांनी सध्याच्या विज्ञानाच्या युगात विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे अशी खंत व्यक्त करत, थोर व्यक्तींचे वाचन प्रेम आणि वाचनातून घडलेली व्यक्तीमध्ये यांचे दाखले देत विद्यार्थ्यांना वाचना बाबत जागृत केले. अध्यक्षीय भाषणात श्री बोडके सर यांनी अब्दुल कलाम यांचे संघर्ष जीवन, परिस्थितीवर मात करत मिसाईल मॅन ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे हा अब्दुल कलाम यांचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.परिस्थिती बदलायची असेल तर वाचन किती महत्त्वाचे आहे हे सांगताना एक पुस्तक हजार मित्रांचे काम करते तेव्हा पुस्तकांचे मित्र बना असाही सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षक यांच्या एकत्रित विचार मंथनातून आजचा वाचन प्रेरणा दिन आगळावेगळा ठरला.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री डी एम नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला श्री. एम एस गुरव श्री व्ही आर गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीक्षा गोवेकर हिने केले व आभार कु.अनुष्का चव्हाण या विद्यार्थिनींने मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण




