सर्वसमावेशक मानवता शिकवते ते साहित्य

प्रा. भाऊसाहेब गोसावी

साहित्याने कसे असावे याची दिशा महात्मा फुले यांच्या साहित्यात स्पष्ट दिसते. साहित्य कसे असावे हे साहित्यिकांना सांगायची गरज नाही. जे सहजपणे , उस्फूर्तपणे प्रगट होते ते साहित्य. जे लेखकाच्या मनात लपलेले असते, त्याच्या भावनेच्या प्रवाहातून बाहेर पडते तेच साहित्य. सर्वसमावेशक मानवता शिकवते ते साहित्य, असे प्रतिपादन प्रा भाऊसाहेब गोसावी यांनी ” सिंधुदुर्गचे लेखक, कवी ” या फेसबुक पेजच्या पहिल्या वर्धापदिनानिमित्त मार्गदर्शन करताना केले.

लोकप्रिय लेखक होणे ही एक भाग्यवान गोष्ट आहे. लेखक अत्यंत तळमळीने आपले साहित्य लिहीत असतो मग ती कविता असो, कथा असो, ललित, कादंबरी, नाट्य, पथनाट्य, चरित्र किंवा आत्मचरित्र असो. त्याची ती स्वनिर्मीती त्याच्या बालपणापासूनच्या जडणघडणीचा वेध घेत असते.

साहित्य म्हणजे आपले विचार लेखकाने समाजापर्यंत पोचवणे. कविता लिहिल्यावर लगेच प्रसारित करण्यापेक्षा काही दिवस ती तशीच ठेवून त्यावर चिंतन करा. कविता लोणच्यासारखी मुरली पाहिजे असा सल्ला प्रा गोसावी यांनी दिला.

साहित्य कसे असावे हा प्रश्न ज्याने त्याने सोडवायचा आहे. भाषा हे जीवनाला समर्थ बनवणारे माध्यम आहे. आजच्या काळात विज्ञान हेच वेद आहेत. जुनाट, अंधश्रद्धेची जळमटे आता मनातून टाकून दिली पाहिजेत. सामाजिक बांधिलकी साहित्यातून जपली गेली पाहिजे.

अनेक लेखकांचे साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. ग्रामीण साहित्य, स्त्री साहित्य, दलीत साहित्य, संत साहित्य, पंडिती साहित्य , शाहिरी साहित्य, बाल साहित्य यांनी साहित्याला समृद्ध केले आहे.

संत साहित्याने समाजाला दिशा द्यायचे काम केले. पंडिती साहित्याने भाषेला प्रभुत्व मिळवून दिले. शाहिरांनी साहित्यातून लोकसंस्कृतीच्या जागराचे काम केले. ग्रामीण साहित्य, दलीत साहित्याने अनेक घटकांच्या वेदना व्यक्त केल्या.

समाजाला अज्ञान, जुनाट रूढी यातून बाहेर काढायचे काम साहित्य करते. सर्वसमावेशक मानवता शिकवते ते साहित्य. बुद्ध, महात्मा फुले आणि गांधी यांनी समाजाला दिशा दाखवली. इथे सगळे नश्वर असले तरी समाजासाठी केलेले काम एक स्मृती स्तंभ निर्माण करून जाते.

साहित्याने कसे असावे याची दिशा महात्मा फुले यांच्या साहित्यात स्पष्ट दिसते. आज खेड्यापाड्यातील लेखक लिहू लागले आहेत. बदलती परिस्थिती, बदलते जग, अनुभव मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

जे लिखाण वाचकाला अस्वस्थ करते ते श्रेष्ठ साहित्य. साहित्य लेखन हा आपल्या जाणिवेचा एक महत्वाचा भाग आहे. साहित्यिक आपल्यासोबत आपल्या भुभागालाही मोठे करत असतो. माणसाला जागे करणारे साहित्य लिहीले जावे अशी अपेक्षा व्यक्त करून प्रा भाऊसाहेब गोसावी यांनी आपले व्याख्यान संपवले.

प्रा.भाऊसाहेब गोसावी हे निवृत्त मराठी विभागप्रमुख असून
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्री लोकगीते” या मालवणी जीवनावरील अत्यंत महत्वाच्या संशोधन ग्रंथाचे लेखक आहेत. तसेच त्यांनी कवितासंग्रह आणि काव्य संग्रह लिहिले आहेत.

सिंधुदुर्गचे लेखक, कवी ” या फेसबुक पेजवर कणकवली येथील रेडीओलोजिस्ट डॉ सतीश पवार यांनी गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडित चाळीस साहित्यिकांबद्दल चरित्रात्मक लेख लिहिले आहेत. डॉ सतीश पवार यांचे ” मी कवी थातूरमातूर, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल, टाळतो मी रस्ता गर्दीचा , सकला” इत्यादी काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

सिंधुदूर्ग (प्रतिनिधी)

error: Content is protected !!