वागदे येथील गॅरेज व्यवसायिकाची आत्महत्या
तालुक्यातील वागदे येथील साईनाथ चंद्रकांत साटेलकर ( ३६ ,रा. वागदे,सावरवाडी) याने आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना छपराच्या लोखंडी बारला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत त्याचा लहान भाऊ राजू साटेलकर याने कणकवली पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
साईनाथ याची पत्नी, आई व दोन मुले ही बुधवारी सकाळी पाहुण्यांकडे गेली होती. सायंकाळी ती पाहुण्यांकडून घरी परतली. दरवाजा उघडल्यावर साईनाथ साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर आईने कामावर गेलेला त्याचा लहान भाऊ राजू याला घरी बोलावून घेतले. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली.
साईनाथ याने आत्महत्या का केली ?याबाबतचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्याचा मोबाईल तपासून पुढील तपास केला जाईल. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
साईनाथ साटेलकर याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व ११ वर्षाची मुलगी तसेच १४ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी