स्ट्रीट लाईटचे बल्ब आम्ही बदलले, हिम्मत असेल तर स्ट्रीट लाईट ग्रामपंचायत ने ताब्यात घ्या!

युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांचे साकेडी सरपंच साटम यांना खुले आव्हान
दुसऱ्यांच्या डोक्याने सरपंच होण्यापेक्षा मैदानात उतरा
आम्ही केलेल्या कामाच्या बातमीची कॉपी करण्यापेक्षा सरपंच सुरेश साटम यांनी गेल्या 4 वर्षात साकेडी गावातील स्ट्रीट लाईटचे बल्ब का बदलले नाहीत? त्याचे उत्तर गावातील जनतेला द्यावे. गेली अनेक वर्ष साकेडी ग्रामपंचायत मध्ये सुरेश साटम हे ज्या पक्षात आहेत त्यांची सत्ता आहे. असे असताना युवासेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही बल्ब बदलून घेतल्यानंतर अचानक 4 वर्षांनी श्री. साटम हे श्रेय घ्यायला का धावले? असा सवाल युवासेनेचे विभाग प्रमुख किरण वर्दम यांनी केला आहे. या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले, सरपंच म्हणून यापूर्वी राहिलेल्या साटम यांना जे स्ट्रीट लाईट चे काम गावात करायला जमलं नाही ते आम्ही आमच्या डोक्याच्या भारानेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लावलं. पण तोच डोक्याचा भार साटम यांना वापरता आला नाही. ही खरी गावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. बल्प हातात घेऊन फोटो काढण्यापुरते आम्ही मर्यादित नाही. तर बल स्ट्रीट लाईट ला लावून ती स्ट्रीट लाईट प्रकाशमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. व तो यशस्वी करूनही दाखवला. मात्र ग्रामपंचायत मार्फत स्ट्रीट लाईटचे बल्ब बदलले असे सांगणारे साटम यांनी यापूर्वी ग्रामसभेमध्ये स्ट्रीट लाईट आमच्या ताब्यात नसल्याने ग्रामपंचायत काम करू शकत नाही हे जाहीर रित्या गावासमोर मान्य केले. त्याचा खुलासा ते करतील काय? एक महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत स्ट्रीट लाईट ताब्यात नाही असे सांगून दुरुस्ती करण्यास नकार देणाऱ्या श्री साटम यांनी आता अचानक स्ट्रीट लाईट ताब्यात न घेता दुरुस्ती ग्रामपंचायत ने केली हे म्हणणे कितपत योग्य आहे. व असं खोटं बोलणं लोकांना पटेल काय? जनता ही दिशाभूल ओळखते. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर स्ट्रीट लाईट येत्या आठ दिवसात ताब्यात घेऊन दाखवा. व सगळ्या स्ट्रीट लाईट ची दुरुस्ती करा. व नंतरच श्रेयासाठी आटापिटा करा. युवासेनेने स्ट्रीट लाईट ला बल्ब लावले एवढे पोटात साटम यांच्या का दुखले? गेल्या वीस वर्षात ग्रामपंचायतीच्या सत्तेत असणाऱ्या साटम यांनी दुसऱ्यांच्या बातम्या कॉपी करण्यापेक्षा स्वतःच्या मनाकडे आधी विचार करावा. स्वतःच्या डोक्याने राजकारण न करता केवळ दुसऱ्यांच्या डोक्याचा वापर करूनच तुम्ही सरपंच झालात हे अगोदर विसरू नका. विकास कामे करत असताना आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले. व विकास कामे केली देखील मात्र तुम्हाला आम्ही केलेली विकास कामे दिसत नाहीत. याउलट खासदार विनायक राऊत यांचे आभार मानणे ऐवजी गावातील लोकांना अंधारात ठेवून केवळ स्टंटबाजी करणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. गावचा विकास तुम्हीच करता असं तुमचं म्हणणं असेल तर 4 वर्षात स्ट्रीट लाईटचे बल्प बदलण्यासाठी तुम्ही तयार का नव्हता? व आम्ही काम केल्यावर त्याचे फोटो काढण्यासाठी का धावला त्याचे उत्तर गावाला द्या. असे श्री वर्दम यांनी म्हटले आहे.
कणकवली प्रतिनिधी