…त्यामुळेच नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश – प्रणव कामत

प्रतिनिधी । कुडाळ : शिक्षक,पालक यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आपण नियोजनबद्ध कठोर श्रम केले तर नीट(,NEET) परीक्षे सारख्या कोणत्याही परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो . असे उद्गार नीट परीक्षेत ६७५ गुण मिळवून रँकिंग मध्ये आलेला व केईएम रुग्णालयामध्ये एमबीबीएस करण्याची संधी प्राप्त झालेल्या शिरोडा येथील डॉक्टर आर.व्ही. कामत यांचा मुलगा प्रणव कामात यांने काढले. तो कुडाळ येथील बॅ. नाथ पै करिअर अकॅडमी तर्फे आयोजित घे भरारी या कार्यक्रमात आपल्या यशस्वीते मागचे रहस्य विद्यार्थ्यांना सांगताना बोलत होता.
त्याने आपल्या पुढील मनोगतामध्ये आपल्या यशाची गुरुकिल्ली विशद करताना ” गुरुनीं दिलेल्या ज्ञानावर श्रद्धा , आई-वडिलांनी दिलेल्या गाईडलाईन्स , नियमित सराव व अभ्यासक्रम-विषय शिकत असताना आलेल्या शंका यांचे त्या त्या वेळी निरसन करून जर अभ्यास केला तर नक्कीच यशस्वी होता येतं. नीट(NEET) किंवा स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपले वैयक्तिक छंद जोपासून थोडं रिलॅक्सही व्हायचं असतं. मोबाईल पासून दूर राहायचं असतं .एवढेच नव्हे तर लहानपणापासून ज्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये भाग घ्यायचा असतो. जेणेकरून आपलं ज्ञान अपडेट होऊन ती भविष्यातील यशस्वीतेची पुंजी ठरते. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपली स्पर्धा आपल्याशीच असली पाहिजे. एखादी गोष्ट का जमत नाही ? ते का जमत नाही? याचा शोध घेतला पाहिजे. त्यातूनच आपल्याला उत्तरं मिळतात. हे सांगत आपण अभ्यास कसा केला, कोणकोणते छंद जोपासले, याची दिलखुलास चर्चा केली . नीट परीक्षेमध्ये ६७५ व भौतिकशास्त्र विषयात त्याला आऊट ऑफ १८०पैकी १८०- असे पैकीच्या पैकी गुण मिळाले होते .परंतु त्याला डॉक्टरी पेशाची आवड असल्यामुळे त्याने एमबीबीएसला प्रवेश घेणे निश्चित केले. त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस साठी प्रवेश मिळालेला आहे.
त्याच्यासोबत यावेळी त्याच्या मातोश्री पल्लवी कामत याही होत्या. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये -प्रणवला लहान असल्यापासून त्याला विविध मान्यवरांची व्याख्याने ऐकण्याची आवड लावली, युट्युब वरील काही प्रबोधनात्मक, प्रज्ञावंतांच्या मुलाखती ऐकाविल्या, प्रज्ञाशोध परीक्षा, प्राविण्य परीक्षा, ऑलिंपियाड परीक्षा, अशा स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षांबरोबरच सांगली येथील अकॅडमी जॉईन करून आपण त्याचा अभ्यास घेत होतो.. त्याला प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी व्हायला सांगितले. त्यामुळे आपल्याला काय येतं आणि काय येत नाही हे आपोआप त्याला कळत गेलं आणि त्यातून तो स्वतःला अपडेट करत गेला. आणि म्हणूनच स्थिरचित्त राहून तो अभ्यास करू शकला …ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे. असे सांगताना यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली.

सी बी एस ई सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य विभा वझे यांनी त्याची मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा गोष्टी त्याच्याकडून कथन करून घेतल्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनातील शंकांचे निरसन करून स्पर्धा परीक्षांची अभ्यास करण्याची त्यांची पद्धतीची जाणून घेतली.
संस्थाचालक उमेश गाळवणकर तसेच बॅरिस्टर नाथ फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या संस्थापिका अदिती पै यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर अकॅडमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी व मान्यवरांच्या मुलाखती, त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करून त्यातून त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करून त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम करत असते. त्यामुळे आपण कुठे आहोत ?आपण यशस्वी होण्यासाठी अजून काय केले पाहिजे? हे विद्यार्थ्यांना आपोआप समजू लागते. या दृष्टीने बॅ.नाथ पै करिअर अकॅडमी मोलाचे कार्य करत असल्याचे दिसते.
यावेळी व्यासपीठावर कला वाणिज्य विज्ञान महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज ,ज्युनिअर कॉलेजचे अर्जुन सातोस्कर ,बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, वैशाली ओटवणेकर, डॉ व्यंकटेश भंडारी, फिजिओथेरपीच्या डॉ प्रगती शेटकर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशेल फर्नांडिस यांनी केले तर उपस्थितांचे आभार पौर्णिमा ठाकूर यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.