रेल्वे स्टेशन-मुडेश्वर मैदानपर्यंतचा रस्ता चौपदरी होणार

अर्थसंकल्पात साडेसहा कोटींची तरतूद
रस्त्याचे डांबरीकरण मजबुतीकरणासह अन्य कामे देखील होणार
शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता चौपदरी केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात साडेसहा कोटींची तरतूद केली आहे. येत्या पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून श्रीधर नाईक तिठा ते रेल्वे स्टेशन या अंतरापर्यंतचा रस्ता दहा वर्षांपूर्वी चौपदरीकरण केला होता. या रस्त्याच्या मध्यभागी पथदीप बसविल्याने रात्रीही या रस्त्याचे सौंदर्य खुलून दिसते. आता रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदानपर्यंतचा रस्ता चौपदरी होणार आहे.
रस्त्याची रूंदी प्रशस्त असल्याने या मार्गावर सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगवॉकसाठी जातात. रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर जाणाऱ्या मार्गावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही निवासस्थान आहे. दहा वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदान पर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण हाती घेतले होते; मात्र रेल्वे स्टेशन परिसरातील जागा विकसित करण्याबाबत रेल्वे खात्याकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदानपर्यतच्या रस्त्याचे विस्तारीकरण रखडले होते.
दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग ही स्थानके विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकण रेल्वे विभागाने मंजूरी दिली. त्यानंतर रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सामंजस्य करार झाला. यात स्थानक आणि तेथील परिसर सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे विकसित करण्याला परवानगी देण्यात आली.
बांधकाम खात्याने रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदानपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बजेटमध्ये मंजुरी दिली. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन ते पुढील एक किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. या रस्त्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा खर्च येणार आहे. लवकरच या कामाच्या निविदा जाहीर होणार असून, पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती श्री सर्वगोड यांनी दिली.
दिगंबर वालावलकर कणकवली