नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायतचे स्वप्न राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याने मार्गी

भाजपा आणि शिवसेनेच्या आयत्या पिठावर रेघोट्या
अनंत पिळणकर यांची टीका
नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी मागील 12 वर्षे मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींच्या माध्यमातून मागील 12 वर्षे मी नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी अथक प्रयत्न करत आहे. मंत्रालयीन पातळीवरून 10 वेळा मागे आलेल्या ग्रामपंचायत फाईल मधील त्रुटींच्या पूर्ततेसाठी अगदी तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती पासून ते जिल्हापरिषद ग्रामपंचायत विभागपर्यंत जाऊन परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर पाठवला. त्याचेच फलित म्हणून आता नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत चे स्वप्न येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. तसा अध्यादेश ग्रामविकास मंत्रालयाकडून निघणार आहे.त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा बालिश प्रयत्न आमदार नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी करू नये असे नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सांगितले. याबाबत बोलताना पिळणकर म्हणाले की, नवीन कुर्ली वसाहत मधील देवघर धरणग्रस्त ग्रामस्थांना नागरी सुविधा हक्काने मिळाव्यात यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी या उद्देशाने मागील 12 वर्षे मी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहे . प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत पाटणकर, गोपाळ दुखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाही काढला. स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी हे नवीन कुर्ली वसाहतीमधील आबालवृद्धांचे स्वप्न आहे. त्यात राजकीय श्रेयवाद कोणीच रंगवू नये. दोन दिवसांपूर्वी माजी सभापती मनोज रावराणेंसह भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंची ग्रामपंचायत विषयाबाबत भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या उपस्थितीत राणे समर्थक भाजपा कार्यकर्ते याच विषयावर शिवसेनेत प्रवेश करतात.यावरून राज्यात सत्तेत भागीदार असलेले शिवसेना भाजपा पदाधिकारी नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत निर्मिती बाबत राजकीय श्रेयवाद घेण्यात गुंग असल्याचे दर्शवित असल्याचे सर्वांनाच समजून आले आहे. 1 मे 2023 रोजी मी स्वतंत्र ग्रामपंचायत साठी नियोजित उपोषण छेडले होते, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नवीन कुर्ली वसाहत साठी पूर्वासित ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत प्रस्ताव पाठवल्याचे लेखी पत्र मला पाठवून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. या पद्धतीने मागील 12 वर्षे मी नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी झटत आहे. नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत बाबत भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची भूमिका ही पूर्णतः राजकीय भावनेने प्रेरित आणि आयत्या बिळात नागोबा सारखी आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांनी घेतलेला पक्षप्रवेश हा राणे समर्थक भाजपा कार्यकर्त्यांचा आहे अशी टीकाही पिळणकर यांनी केली आहे.
कणकवली प्रतिनिधी