कणकवलीतील दोन क्रशरचा विद्युत व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

क्रशर बंद करण्याबाबत करण्यात आली होती आंदोलने
कणकवली तालुक्यामधील ग्रामपंचायत कळसुली व शिवडाव येथील सुरू असलेल्या क्रशरमुळे गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून सदर क्रशरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून व सरपंच सचिन पारधिये यानी शासनाकडे गेले वर्षभर केल्या होत्या. व सदर क्रशर बंद करण्यात यावेत अशी जोरदार मागणी केली होती. याबाबत प्रसंगी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.
स्थानिक आमदार नितेश राणे यानीही विधानसभेमध्ये आवाज उठवून शासन दरबारी सदर बेकायदा सुरू असलेले क्रशर बंद करण्याची मागणी लावून धरली होती. या सर्व प्रयत्नांना यश आले असून शिवडाव येथील मे. एस. व्ही. स्टोन क्रशर व कळसुली उल्हासनगर येथील मे. व्हिक्टर एन्टर प्रायझेस या दोन क्रशरवर कारवाईच्या बडगा उगरला असून, या दोन क्रशरचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यानी दिनांक २२ मे २०२३ रोजी जारी केले असून तशा सूचना महावितरण कणकवली तसेच ग्रामपंचायत कळसुली व ग्रामपंचायत शिवडाव यांना दिले आहेत. अशा प्रकारची कारवाई शासनाकडून झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. अशी माहिती सरपंच सचिन पारधीये यांनी दिली.
कणकवली प्रतिनिधी