उडून जाणारी शाई चिरे पासवर वापरून बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी खाण मालकासह ट्रक मालक, चालक निर्दोष

संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
गौण खनिज वाहतुकीच्या पासवर उष्णतेने उडणाऱ्या शाईचा वापर करून किर्लोस कुडाळ अशी अनधिकृत चिरे वाहतूक करताना तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र ते सिंह यांनी स्वतः केलेल्या कारवाईप्रकरणी शासनाची फसवणूक करून खोटा दस्तऐवज तयार केल्याच्या दाखल गुन्हयातून चिरेखाण मालक प्रशांत सावंत, ट्रक मालक नितीन कामतेकर व चालक मंगेश सावंत यांची मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
३ मे २०१२ रोजी कसाल – बालमवाडी येथे दु. ३ वा. च्या सुमारास तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी चिऱ्याचा डंपर (एमएच०७ १०५७) बाबत तपासणी केली असता डंपर चालक मंगेश सावंत याने सादर केलेला गौण खनिज वाहतुकीचा पास पाहता मूळ पास नं. ३२३ वरील मजकूर हा उष्णतेने उडून जाणाऱ्या शाईचा वापर करून नमूद केलेला आढळला. त्यामुळे कसाल तलाठी मेघनाथ पाटील आणि मंडळ अधिकारी वासुदेव पवार यांना खनिज वाहतूक परवाना असलेले खाण मालक प्रशांत सावंत व डंपर मालक नितीन कामतेकर व चालक मंगेश सावंत यांच्याबाबत कारवाईच्या दिलेल्या आदेशानुसार मंडळ अधिकारी वासुदेव पवार यांनी ओरोस पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून
भादंवि कलम ४२०, ४७१, सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, पंचनामा सिद्ध न होणे, तपासातील त्रुटी यामुळे तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
कणकवली प्रतिनिधी





