वाहतूक पोलीस कार्यरत असून देखील कणकवलीत खुलेआम रस्त्यावर पार्किंग

कणकवली शहरातील सर्विस रस्त्यावरच्या स्थितीला जबाबदार कोण?
वाहतूक पोलीस व होमगार्ड निव्वळ शिट्टी मारण्यापुरतेच कार्यरत
कणकवली शहरात सातत्याने सर्विस रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना कणकवली पटवर्धन चौकात ज्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस व होमगार्ड कार्यरत असतात येथेच वाहने पार्किंगचा तळ बनला आहे. यामुळे सातत्याने पटवर्धन चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. व यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच अनेकदा वाहतूक पोलीस पटवर्धन चौकात कार्यरत नसल्याने केवळ शिट्ट्या मारण्यापुरते होमगार्ड कार्यरत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. तसेच अनेकदा वाहतूक पोलीस कार्यरत असून देखील त्यांच्याकडून खुलेआम पार्किंग केल्या जात असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे पोलीस येथे काय कामाचे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. आज सकाळच्या सत्रात खुलेआम पणे हॉटेल मंजुनाथ ते अगदी बस स्थानकापर्यंत सर्विस रस्त्यावर जागोजागी वाहने पार्किंग केलेली असताना सुद्धा व बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी सर्व्हीस रस्त्यावर वाहने पार्किंग केल्याने अनेकदा एसटी मार्गस्थ होत नसून सर्विस रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. तरी देखील ही वाहने हटवण्याच्या दृष्टीने किंवा कारवाईच्या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पटवर्धन चौकात कार्यरत असणारे होमगार्ड व वाहतूक पोलीस हे निव्वळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत डीवायएसपी विनोद कांबळे व कणकवलीतील पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे लक्ष देतील काय? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली