प्राथमिक शिक्षक पतपेढीसाठी दोडामार्गात तिरंगी लढत

उत्सुकता:पंचवीस वर्षांची परंपरा शिक्षक संघ टिकवणार का?
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक ऐन रंगात आली आहे. प्रचाराचा धुरळा उडतो आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक समिती विरुद्ध अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती असे दुरंगी लढतीचे चित्र असले तरी दोडामार्ग तालुका मात्र त्याला अपवाद आहे. दोडामार्गमध्ये तिन्ही संघटना स्वतंत्रपणे लढत असल्याने इथे तिरंगी लढतीची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकीत प्राथमिक शिक्षक संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.साहजिकच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दोडामार्गकडे लागून राहिले आहे.त्यामुळे या वर्षी प्राथमिक शिक्षक संघाची ती पंचवीस वर्षांची परंपरा कायम राहील की खंडित होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीसाठी १४ मेस मतदान तर मतमोजणी १६ मेस होणार आहे. त्या दृष्टीने प्रचाराला वेग आला आहे. जिल्ह्यात एकूण १५ संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे .आठ तालुक्यांत आठ सर्वसाधारण संचालक पदे तर जिल्हास्तरीय सात संचालक पदे आहेत. त्यातील दोडामार्गमधील सर्वसाधारण संचालक पदाची निवडणूक प्राथमिक शिक्षक संघाने प्रतिष्ठेची बनवली आहे. कारण गेल्या पंचवीस वर्षात दोडामार्गचे संचालकपद आपल्याकडे ठेवण्यात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने यश मिळवले आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक समितीचे वर्चस्व तर दोडामार्गमध्ये शिक्षक संघाचे वर्चस्व असे चित्र असे.
यावर्षी जिल्ह्यात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि शिक्षक भारतीने युती करुन प्राथमिक शिक्षक समितीसमोर आव्हान उभे केले आहे. दोडामार्गमधील एका सर्वसाधारण जागेसाठी शिक्षक संघाकडून राजेंद्र काळबेकर, शिक्षक भारतीकडून दयानंद नाईक तर शिक्षक समितीकडून महेश काळे निवडणूक रिंगणात आहेत.
यावेळी पतपेढीची निवडणूक ऐन उन्हाळा सुटीत जाहीर झाली आहे. कोरोनामुळे दीड ते दोन वर्षे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता निवडणूक जाहीर झाली असली तरी नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या झाल्याने आणि सुटीमुळे अनेक शिक्षक घाटमाथ्यावरील आपापल्या गावी गेले आहेत.त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. त्या शिक्षकांना मतदानासाठी आणण्यासाठी सर्वांना शिकस्त करावी लागणार आहे.
संघटनांचे दावे प्रतिदावे
तालुक्यातील शिक्षक मतदारांची संख्या १९० आहे. त्यातील ७८ मते संघाकडे,५८ मते शिक्षक भारतीकडे,४८ मते शिक्षक समितीकडे तर इतर संघटनेकडे उर्वरित मते आहेत. शिक्षक संघ आणि शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वाधिक मते आपल्याकडे असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष मते कोणाकडे किती आहेत ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
शिक्षक संघाचे आतापर्यंतचे विजयी संचालक
गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक संघाने येथील संचालक पद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले होते. ते पाच संचालक असे: वामनराव देसाई, गुरूदास कुबल, रामकृष्ण गवस, महेश नाईक, आत्माराम देसाई.
दुसरी हॅटट्रिक करुन इतिहास घडवणार : कुबल
गेली पंचवीस वर्षे तालुक्यांतील शिक्षक सभासदांनी आमच्या संघटनेवर विश्वास ठेवून मतदान केले. तो आम्ही सार्थ ठरवला. याहीवेळेला सर्व सभासद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांदा हॅटट्रिक करुन इतिहास घडवणार आहोत असा विश्वास प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रवक्ते गुरूदास कुबल यांनी व्यक्त केला.
यावर्षी विजय शिक्षक भारतीचाच: नाईक
शिक्षक भारतीने शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या संघटनेचे जवळपास ७० सभासद मतदार तर इतर संघटनेचे दहाहून अनेक मतदार यावेळेला आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विजय आमचाच आहे. येथील संचालक म्हणून आपली निवड निश्चित आहे, असा विश्वास शिक्षक भारतीचे उमेदवार आणि जिल्हा संघटक दयानंद नाईक यांनी व्यक्त केला.
दृष्टिक्षेपात निवडणूक
तालुका संचालक पद निवडणूक
जागा… १
उमेदवार…३
राजेंद्र काळबेकर… शिक्षक संघ
दयानंद नाईक… शिक्षक भारती
महेश काळे… शिक्षक समि ती
मतदान…१४ मे
मतमोजणी…१६ मे
मतदार संख्या…१९०
प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग