तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!

“महायुती सरकारच्या काळातच महाराष्ट्रातील लोककलांना मिळाला खरा राजाश्रय!”

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककला आणि कलाकारांना सन्मानाचे व्यासपीठ – आमदार प्रमोद जठार

कणकवली-सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने खास देवदिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी ईली फराळाक येवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आज कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देखणा आविष्कार रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.

कोकणच्या मातीत रुजलेली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी दशावतार लोककला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. तब्बल ३० कलाकारांच्या सहभागातून कोकणची शान असलेल्या दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. कलाकारांनी आपल्या अभिनयातून, संवादातून आणि पारंपरिक कलाविष्कारातून उपस्थित रसिकांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमात कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.

या कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार म्हणाले की, आपल्या महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि कलाकारांना खऱ्या अर्थाने राजाश्रय देण्याचे काम होत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलेच्या संवर्धनासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. कोकणची ओळख असलेल्या दशावतारासारख्या लोककलांना प्रोत्साहन मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मालवणी स्टार दिगंबर नाईक आणि श्रुती परब यांनी आपल्या खास मालवणी शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला कोकणी बाज आणि विशेष रंगत प्राप्त झाली.

यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. देवदिवाळीच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यामुळे कणकवलीत कोकणच्या लोककलेचा आणि परंपरेचा जागर अनुभवायला मिळाला.

error: Content is protected !!