कणकवली मसुरकर किनई रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांवर कारवाईसाठी नगरपंचायतची डोळेझाक

मच्छी मार्केटमध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांवर यामुळे होत आहे अन्याय
नियम पायदळी तुडवणाऱ्या विक्रेत्यांवर नगरपंचायत कारवाई करणार का?
कणकवली नगरपंचायत चे मच्छी मार्केट असताना देखील कणकवली शहरातील मसूरकर किनई रस्त्यावर कलमठ व आचऱ्यावरून येणारे अनेक मच्छी विक्रेते थेट रस्त्यावरच मच्छी मार्केट थाटून बसत आहेत. असे असून देखील कणकवली नगरपंचायत चे मात्र याकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. कणकवली शहरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे व वाहने पार्किंग यामुळे रुंद असून देखील शहरातील काही रस्ते वाहतुकीला त्रासदायक ठरत आहेत. मसूरकर किनई मधून गांगो मंदिर या ठिकाणी जाणारा हा रुंद रस्ता असून देखील या मच्छी विक्रेत्यांनी रस्त्यावरतीच मच्छी मार्केट थाटून देखील नगरपंचायत यांच्यावर कारवाई करण्यामागे दुर्लक्ष करत आहे. कणकवली शहरात यामुळे अस्वच्छता पसरत असून शहरातील नागरिकांमधून देखील या ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्व मच्छी विक्रेत्यांनी एका ठिकाणी बसावे याकरिता मच्छी मार्केटची उभारणी केलेली असताना नगरपंचायत प्रशासन या मसूरकर किनई रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना पाठीशी का घालत आहे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत वर्षभरापूर्वी कणकवली व कलमठ हद्दीच्या मुद्द्यावरून मच्छी विक्रेत्यांनी कलमठ हद्दीत आजरा रस्त्या नजीक मच्छी विक्री करता बसायला सुरुवात केल्यानंतर याबाबत वृत्तप्रसारित झाल्यावर कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी तात्काळ दखल घेत या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता. सातत्याने कारवाईच्या बडग्यामुळे अखेर या विक्रेत्यांनी मसूरकर किनई रस्त्यावर आपले विक्रीकरिताचे दुकान थाटले. मात्र कणकवली नगरपंचायत च्या प्रशासकीय ढिसाळपणामुळे या विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. दर रविवार, मंगळवार, बुधवार अशा ठराविक वारांना हे विक्रेते अक्षरशः येथे दुकाने रस्त्यावर मांडून खुलेआम मच्छी विक्री करत असतात. यामुळे वाहतूक कोंडी सोबतच या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरते व नगरपंचायत च्या अधिकृत मच्छी मार्केटमध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांचे देखील यामुळे नुकसान होते. या साऱ्या प्रकारामध्ये नियम पाळणाऱ्यांना भुर्दंड व नियम मोडणाऱ्यांना मुभा अशी कणकवली नगरपंचायत प्रशासनाची स्थिती पाहायला मिळत आहे. याबाबत कणकवलीचे नगराध्यक्ष हे स्वतः याप्रकरणी लक्ष घालतील का? असा देखील प्रश्न कणकवली शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. केवळ मसूरकर किनई रस्ताच नाही तर कणकवली बस स्थानकाच्या बाहेर देखील असे काही मच्छी विक्रेते मच्छी विक्री करता बसलेले असतात. त्यामुळे शहरात सर्व मच्छी विक्रेत्यांनी एकाच जागी बसण्यासाठी सर्वांनाच समान न्याय हे धोरण नगरपंचायत ठेवणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. कणकवली नगरपंचायत च्या मागील एका बैठकीमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर रात्रीच्या वेळी थांबणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना व तेथे दुकाने थाटलेल्या मच्छी व्यवसायिकांवर कारवाई चा बडगा उचलला गेला होता. पण मसूरकर किनई रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर मात्र कारवाईसाठी नगरपंचायतची डोळेझाक असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर नगरपंचायत आता काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






