समाज बांधवांनी संघटित होणे काळाची गरज – राजन नाईक

वेंगुर्ल्यात देवळी समाजाचा मेळावा उत्साहात

वेंगुर्ल्यात २१ विद्यार्थ्यांसह ४३ ज्येष्ठांचा सन्मान

समाजाची एकजूट आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटितपणे समाजोपयोगी उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केले.
देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लेच्या वतीने तालुक्यातील समाज बांधवांचा मेळावा नुकताच सुंदर भाटले येथील साई मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष रमेश नरसुले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राजन नाईक, कुडाळचे घनश्याम वालावलकर यांच्यासह ज्येष्ठ समाज मार्गदर्शक उपस्थित होते.
सन १९९८ पासून वेंगुर्ले शाखेच्या वतीने समाज मेळावा, विद्यार्थी गुणगौरव आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्याची परंपरा सातत्याने जपली जात आहे. या उपक्रमाचे कौतुक करत राजन नाईक यांनी तालुकाध्यक्ष रमेश नरसुले आणि त्यांच्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवून जिल्ह्यातील समाज बांधवांना संघटित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दीपप्रज्वलन आणि ईशस्तवनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी शिष्यवृत्तीप्राप्त दोन, प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण दोन, दहावी उत्तीर्ण सात, बारावी उत्तीर्ण सहा आणि पदवीधर चार अशा एकूण २१ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
तसेच डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल (सी.ए.), सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच आदर्श कर्मचारी पुरस्कारप्राप्त समाज बांधवांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील ७० वर्षांवरील ४३ ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेले मारुतीराया सोनू रेडकर आणि भारती मारुतीराया रेडकर या दाम्पत्याचा शाल, श्रीफळ आणि साडी-चोळी देऊन व्यासपीठावर विशेष सत्कार करण्यात आला. या दुर्मिळ आणि प्रेरणादायी सोहळ्याने उपस्थित समाज बांधव भारावून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या दाम्पत्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर मंडळाकडे प्राप्त झालेल्या वधू-वरांच्या परिचयपत्रांचे वाचन करण्यात आले. ज्येष्ठ समाज मार्गदर्शक सावळाराम अणावकर, घनश्याम वालावलकर, सुधाकर खानोलकर, मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर आणि जिल्हा सचिव विष्णू चौकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वजराटकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष रमेश नरसुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शेखर तुळसकर, अरुण घोगळे, सुधाकर वेंगुर्लेकर, सीमा वेंगुर्लेकर, रमा खानोलकर, चेतन नरसुले, सौम्या नरसुले, कविता घोळेकरकर, कमलाकर सातार्डेकर, मयूर आरोलकर, गौरी तुळसकर, तन्वी नरसुले, आर्या खानोलकर आदींनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!