कणकवली रेल्वे स्टेशन वरील सुविधांच्या शुभारंभाचा पालकमंत्र्यांकडून धडाका

कोकण रेल्वे प्रवाशांना तीन सुविधा आता नव्याने उपलब्ध होणार
गेली अनेक वर्षांची मागणी या कामांमधून होत आहे पूर्ण
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या शेडचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून या शेडची मागणी केली जात होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे. याच कार्यक्रमात अद्ययावत सिग्नल यंत्रणेचा आणि कोच इंडिकेटर सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
कणकवली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ येथे शेड नसल्याने रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी शेड उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. प्रवासी संघटनेनेही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांना शेडचा आधार मिळणार आहे.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, रेल्वे प्रशासनाकडे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी शेड उभारण्याची मागणी फार जुनी होती. प्रवासी संघटनेचीही ही मागणी होती. रेल्वे खात्याबरोबर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आले असून आज या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकण रेल्वे आपल्या भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांशी जोडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे रेल्वेची वाट पाहताना प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी, या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले, शेडप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची मागणी करण्यात आली होती. लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात कणकवलीसह सिंधुदुर्ग आणि कोकणातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे.
दरम्यान, कणकवली रेल्वे स्थानकावर अद्ययावत सिग्नल यंत्रणेचाही शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक यंत्रणेमुळे रेल्वे गाड्यांची ये-जा नियंत्रित करणे, रेल्वे मार्ग सुरक्षित ठेवणे तसेच सिग्नल आणि रेल्वे पॉइंट्समध्ये समन्वय राखणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे रेल्वे संचालन अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होण्यास मदत मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना रेल्वेची माहिती सहज मिळावी, यासाठी कोच इंडिकेटर सुविधेचेही लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मंडलचे मंडल रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, गोकुळ सोनवणे (ए.एस.सी., रत्नागिरी), राजेश सुरवाडे (पीआय, आरपीएफ कणकवली), सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, सहदेव उर्फ अण्णा खाडये, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, औदुंबर राणे, माजी नगरसेवक अभय राणे, अमोल रासम, सागर राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि सेवानिवृत्त तहसीलदार आर. जे. पवार आदी उपस्थित होते.






