१६ हजार ७१७ पदांच्या भरतीसाठी कुडाळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून २१ नोव्हेंबरला आयोजन
पदवीधर युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध विभागांतील १६ हजार ७१७ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या अभ्यासाला दिशा मिळावी, या उद्देशाने आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलजवळील मराठा समाज हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, महत्त्वाचे विषय, तयारीची योग्य पद्धत आणि परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक बाबी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधीही मिळणार आहे.
आगामी भरती प्रक्रियेचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कुडाळ-मालवण मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना मिळावा, या हेतूने आमदार निलेश राणे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व पदवीधर इच्छुक उमेदवारांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, आनंद भोगले, नागेश परब, विनायक अणावकर, सुरेश धुमक आदी उपस्थित होते.






