कुडाळमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र’ लवकरच लोकार्पण

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी मराठा समाज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मुख्याधिकारी खंडू पवळ आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असल्याचे सांगत, त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ पुढील पिढीला मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ज्येष्ठांना भौतिक सुविधांसोबतच प्रेम, आपुलकी, संवाद आणि सन्मानाची गरज असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवळकर यांनी सांगितले. “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांचा सन्मान असून, त्यांच्या अनुभवाची शिदोरी पुढील पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, वर्षभर ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आपण काय करतो, याचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. ज्येष्ठांना संपत्तीपेक्षा प्रेमाचे दोन शब्द, संवाद आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असते. कामातून निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठांनी स्वतःला निरुपयोगी समजू नये; त्यांचा अनुभव हे समाजाचे ‘अनुभवांचे ग्रंथालय’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, कबीर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत ज्येष्ठांची सेवा ही मानवी मूल्यांची जपणूक असल्याचे मुख्याधिकारी पवळ यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्या कल्याणासाठी नगरपंचायतीकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या व भावना जाणून घेण्यासाठी नगरपंचायतीने त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला असून, ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र’ लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठांना विरंगुळा, संवाद आणि आनंदाचे वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्माननीय, सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करणे ही कुटुंबासोबतच समाज आणि स्थानिक प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!