‘आजोळ’मधील वृद्धांना आरोग्याच्या मायेची ऊब !

बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे मोफत तपासणी शिबिर

जागतिक वृद्धत्व दिनानिमित्त नेरूर येथील ‘आजोळ’ वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व फिजिओथेरपी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, प्रा. शंकर माधव आणि रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापिका सौ. संगीता महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या सांधेदुखी, कंबरदुखी, रक्तदाब, मधुमेह तसेच विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार विविध फिजिओथेरपी उपचार देऊन ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा ‘आजोळ’मधील सुमारे १८ ते २० ज्येष्ठ नागरिकांना लाभ झाला.
या उपक्रमात फिजिओथेरपी महाविद्यालयातील ४० ते ५० विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस करत त्यांची आरोग्य तपासणी केली आणि विविध आजारांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मायेच्या भावनेने केलेली सेवा पाहून ‘आजोळ’मधील ज्येष्ठ नागरिक भारावून गेले. त्यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच संपूर्ण टीमचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
या उपक्रमातून ‘ज्येष्ठांची सेवा हीच खरी माणुसकी’ हा संदेश देत वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

error: Content is protected !!