कुडाळेश्वर मंदिरात ११ ऑक्टोबरपासून ५१ वी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने कै. अॅड. अभय देसाई स्मृती ५१ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत दररोज दोन भजन मंडळांना भजन सादर करण्याची संधी मिळणार असून, पहिला भजन कार्यक्रम रात्री ८ ते ८.४५ आणि दुसरा ९ ते ९.४५ या वेळेत होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून, भजन सादर केल्यानंतर हे शुल्क संबंधित मंडळाला परत करण्यात येईल. तसेच प्रत्येक भजन मंडळाला १ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, १० हजार, ५ हजार आणि २ हजार ५०० रुपये अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक भजन मंडळांनी आपले प्रवेश अर्ज १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावेत.
प्रवेश अर्जासाठी महेश कुडाळकर – ९४२०२१००२० किंवा निलेश कुडाळकर – ९४२२३७९७१७ यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज श्री कुडाळेश्वरवाडी, कुडाळ येथे स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.






