वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा सुंदर मिलाफ म्हणजे बॅ. नाथ पै’ — अशोक येजरे

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत बॅ. नाथ पै यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुंदर मिलाफ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होत. त्यांचे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आदर्शाचा वस्तुपाठ असून, त्यांनी दिलेले विचार चिरकाल टिकणारे आहेत. यश सन्मानाने मिळविले तर त्याचा आनंद मुक्तपणे घेता येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बॅ. नाथ पै होत, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे यांनी केले.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत बॅ. नाथ पै यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून येजरे बोलत होते. यावेळी त्यांनी बॅ. नाथ पै यांच्या जनसामान्यांचा नेता म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेतला. बॅ. नाथ पै हे सर्वधर्मसमभावाचा आदर करणारे होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्यांनी कार्य केले. स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे करण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. आभाळाएवढी उंची असलेल्या नाथ पै यांचे पाय मात्र कायम जमिनीवर होते, असेही येजरे यांनी नमूद केले.
समाजहितैषी बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था उमेश गाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली दमदार आणि नाविन्यपूर्ण वाटचाल करत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदीप नेरूरकर यांनी बॅ. नाथ पै यांचा ‘संस्काराचे झाड’ असा उल्लेख केला. आई-वडिलांनी आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत, याचे उत्तम उदाहरण बॅ. नाथ पै यांच्या जीवनातून मिळते. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून राजापूर मतदारसंघासह कोकणचे नाव देशभर पोहोचविणाऱ्या बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा शिक्षण संस्था जपत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी बॅ. नाथ पै यांचा गौरव करताना त्यांना ‘चालते-बोलते ज्ञानपीठ’ असे संबोधले. चांगले ज्ञान, संपन्न व तत्त्वनिष्ठ विचार सोबत असतील, तर जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते. त्यामुळे जीवन अधिक सुखी आणि समाधानी होते. बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या वतीने अद्वैत काळसेकर, आरुष पटवारी, स्वरा कोळी, राखी परब आणि सीमा राठोड यांनी मनोगत व्यक्त करून बॅ. नाथ पै यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘खरा तो एकची धर्म’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उमेश गाळवणकर, प्रदीप नेरूरकर, डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, चैताली बांदेकर, पल्लवी कामत, प्रा. शांभवी आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध विद्याशाखांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले. सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले, तर आभार अश्विनी परब यांनी मानले.






