हायस्कूल मधील विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या हेमंत सावंत या शिक्षकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा) व भारतीय न्याय संहिते च्या कलमानुसार गुन्हा दाखल
पोलीस तपासाकडे पालकांचे लक्ष
देवगड तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या 15 वर्षीय दहावी मधील एका विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारून त्या विद्यार्थ्याला दुखापत केल्याप्रकरणी त्या हायस्कूलचा शिक्षक हेमंत प्रताप सावंत याच्यावर देवगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा) 2015 च्या कलम 75 व भारतीय न्याय सहिता बी एन एस 2023 चे कलम 115 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार त्या फिर्यादीचा चुलत पुतण्या हा त्या हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. 19 ऑगस्ट 2026 रोजी तो विद्यार्थी दहावीच्या वर्गामध्ये बसलेला असताना त्याने आपल्या बाजूला बसलेल्या मुलाला तू जरा बाजूला सरकून बस असे बोलला. यादरम्यान संशयित आरोपी शिक्षक हेमंत सावंत याने त्याला पाहिल्यावर रागाच्या भरात त्या पीडित मुलाच्या पाठीवर व कानफाटात हाताने थापटाने मारहाण करत दुखापत केली. त्यानंतर सायंकाळी पीडित विद्यार्थी हा घरी गेल्यानंतर त्याने तो राहत असलेल्या त्याच्या काकी हिला सदर घटना सांगितली. यानंतर फिर्यादी यांना याबाबतची माहिती समजल्यावर त्यांनी सदर विद्यार्थ्याचे वडील यांना देखील या घटनेची कल्पना दिली. सदर घटनेनंतर फिर्यादी पीडित मुलाला कणकवलीतील एका खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार करता घेऊन गेले. व त्यानंतर पुन्हा 24 ऑगस्ट रोजी त्या गावात असलेल्या आरोग्य केंद्रात या दुखापत झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी घेऊन गेले. मात्र त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या दरम्यान त्या विद्यार्थ्याला चक्कर येऊ लागल्याने त्यावेळी त्याला उपचारासाठी नेले नाही. या घटनेमुळे सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या हायस्कूलचा शिक्षक हेमंत प्रताप सावंत याने आपल्या पुतण्याला रागाच्या भरात पाठीवर व कानफटात हाताने मारहाण करून दुखापत केली म्हणून याबाबत 28 ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेमध्ये संशयित आरोपी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता पोलीस तपासाकडे लक्ष लागून राहिले आहे.
देवगड प्रतिनिधी





