कुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

ॲड. राजीव बिले यांचा यशस्वी युक्तिवाद

कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०१८ मधील वनरक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
दि. २ मार्च २०१८ रोजी कालेली जंगल परिसरात गस्तीवर असताना वनरक्षक सुनील शिवाजी भंडारे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मधुकर रामचंद्र परब (५७), महेश विठ्ठल घाडी (५१) आणि बाळकृष्ण अर्जुन घाडी (६६), सर्व रा. कालेले, ता. कुडाळ, यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३२३ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाला आरोपींविरुद्धचा गुन्हा वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यात यश आले नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच पंचनामा विश्वासार्ह नसल्याचे आणि संबंधित वनरक्षक शासकीय कामावर असल्याबाबत आवश्यक कागदोपत्री पुरावा सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या बाबींचा विचार करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
आरोपींच्या वतीने ॲड. आर. डी. बिले, ॲड. संजय खानोलकर, ॲड. दत्ताराम राजीव बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले. प्रकरणात ॲड. राजीव बिले यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला.

error: Content is protected !!