डॉक्टरांच्या राजीनाम्याला सत्ताधारीच जबाबदार !

कुणाल किनळेकर यांचा दीपक केसरकरांवर निशाणा

केसरकर, हा राजकीय दहशतवाद नाही का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असताना जिल्हा शल्य चिकित्सकांसह काही डॉक्टरांनी राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ झाल्यामुळेच डॉक्टरांनी राजीनामा दिला असावा, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकाम नियमानुसार हटविणे योग्य असले, तरी राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे अथवा दमदाटी करणे कितपत योग्य आहे, असा सवालही किनळेकर यांनी उपस्थित केला.
जिल्हा शल्य चिकित्सक व इतर डॉक्टरांच्या राजीनाम्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेच जबाबदार असतील, तर याला केसरकर यांच्या भाषेत ‘राजकीय दहशतवाद’ म्हणायचे नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सिंधुदुर्गात राजकीय दहशतवादाच्या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठविणारे आमदार दीपक केसरकर या प्रकरणात मात्र कोणती भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ‘राजकीय दहशतवादाविरोधात बोलताना केसरकर आता धृतराष्ट्राची भूमिका सोडणार का?’, असा सवालही कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता असलेल्या जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही होत आहे.

error: Content is protected !!