दहा लाखांच्या धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

माणगाव येथील बॅन्टो ग्रेगरी रॉड्रिक्स यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणात कुडाळ येथील न्यायदंडाधिकारी नम्रता ए. बकरे यांच्या न्यायालयाने विनायक बाळकृष्ण कुडतरकर (वय ४५, रा. माणगाव बाजार) यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे वकील आर. डी. बिले यांनी युक्तिवाद केला.
या प्रकरणाची घटना ७ मार्च २०२१ रोजी घडली होती. त्यानंतर ३० मार्च २०२१ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षे पाच महिन्यांच्या सुनावणीनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने निकाल दिला.
फिर्यादी बॅन्टो ग्रेगरी रॉड्रिक्स यांच्या वडिलांनी आरोपी विनायक कुडतरकर यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळोवेळी एकूण १० लाख रुपये दिल्याचे फिर्यादीचे म्हणणे होते. ही रक्कम १० ऑगस्ट २०१९ पर्यंत आरोपीला देण्यात आली होती. सदर रक्कम चार महिन्यांत परत करण्याचे आश्वासन देत आरोपीने करार केल्याचेही फिर्यादीकडून सांगण्यात आले.
या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने १० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने धनादेश वटला नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपीविरुद्ध चलनक्षम लिखत अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत कुडाळ न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
मात्र, आरोपीकडून फिर्यादीचे कायदेशीर देणे बाकी होते, हे फिर्यादी न्यायालयासमोर सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे उपलब्ध पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपी विनायक कुडतरकर यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. आर. डी. बिले यांनी बाजू मांडली. तसेच ॲड. दत्ताराम राजीव बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले.






