१५ वर्षांपासून रखडलेल्या हिंदू कॉलनीला प्रकाशाची वाट

सुशोभित पथदिवे कार्यान्वित
शिवसेना शाखाप्रमुख बाळा कुडाळकर यांची माहिती
कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे अखेर कार्यान्वित झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथदिवे सुरू झाल्याने परिसरातील रहिवासी आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून हे पथदिवे बसविण्यात आले आहेत. आमदार निलेश राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण होऊन पथदिवे कार्यान्वित झाल्याचे शाखाप्रमुख बाळा कुडाळकर यांनी सांगितले.
हिंदू कॉलनी परिसरातील रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. नवीन पथदिव्यांमुळे परिसर उजळून निघाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून हिंदू कॉलनीतील विकासकामे रखडली असून, प्रलंबित कामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि कुडाळ शहर शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आगामी काळात हिंदू कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामांचा पाठपुरावा सुरूच राहील, असे हिंदू कॉलनी शिवसेना शाखाप्रमुख बाळा कुडाळकर यांनी सांगितले.
हिंदू कॉलनीसह संपूर्ण कुडाळ शहरातील प्रलंबित विकासकामांना आगामी काळात अधिक गती मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवापूर्वी पथदिवे कार्यान्वित झाल्याबद्दल हिंदू कॉलनी शिवसेनेच्या वतीने पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि कुडाळ नगरपंचायतीचे आभार मानण्यात आले.






