प्रा. अजित व्हनमाने रोटरीच्या ‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने सन्मानित

सलग तीन वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी घडविणारे शिक्षक

अजित व्हनमाने यांची २४ वर्षांची ज्ञानसेवा !

कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयाचे शिक्षक अजित काशिनाथ व्हनमाने यांनी आपल्या २४ वर्षांच्या अध्यापन सेवेत उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करत विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. नुकताच त्यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने मानाचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला.
एम.कॉम., बी.एड. शिक्षण घेतलेल्या श्री. व्हनमाने यांनी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयाच्या अध्यापनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य शाखेचा निकाल सातत्याने १०० टक्के लागत असून, त्यांच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत २०१९ मध्ये कोकण विभाग शिक्षक आघाडीच्या वतीने ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’, तर २०२३ मध्ये शिक्षक भारती संघटनेतर्फे ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अध्यापनाबरोबरच श्री. व्हनमाने यांनी कला क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या शतक महोत्सवी वर्षात विविध नाट्यप्रयोगांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘गांधी विरुद्ध सावरकर’, ‘वाईट पेपर’ तसेच बाबासाहेब पुरंदरे निर्मित ‘जाणता राजा’ या नाटकात त्यांनी तानाजीची भूमिका साकारली आहे.
बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील त्यांचे विशेष प्राविण्य असून त्यांनी राज्यस्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक व समीक्षक म्हणूनही काम केले आहे. तसेच या विषयासाठी परीक्षक, नियामक, मुख्य नियामक आणि पेपर सेटर म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
अध्यापन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, विषयातील तज्ज्ञ म्हणून योगदान आणि कला क्षेत्रातील सहभाग अशा विविध अंगांनी श्री. अजित व्हनमाने यांची २४ वर्षांची शैक्षणिक वाटचाल उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडत असून, कुडाळच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

error: Content is protected !!