कुडाळमध्ये अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश

कुडाळ बाजारपेठ व कुडाळ-मालवण मार्गावर अवजड वाहतुकीला प्रतिबंध

एसआरएम कॉलेज–एमआयडीसी मार्गे वाहतूक वळविणार

गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेतून न आणता पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये हा आदेश पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शहरातील मुख्य बाजारपेठ जुनी व महत्त्वाची आहे. शहरात मोठी रुग्णालये, उच्च शिक्षण संस्था तसेच कुडाळ रेल्वे स्थानक असल्याने नागरिक, रुग्ण, विद्यार्थी व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचबरोबर कुडाळ एमआयडीसीमध्ये ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत असून मालवण तालुक्यातील खाणींमधून चिऱ्यांची वाहतूक कोल्हापूर, गोवा व कर्नाटकच्या दिशेने कुडाळमार्गे केली जाते.
शहरातील अरुंद रस्ते, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि मुख्य बाजारपेठेतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.

एसआरएम कॉलेज–एमआयडीसी मार्गे वाहतूक

  आदेशानुसार कुडाळ शहरात होणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेत न आणता एसआरएम कॉलेज येथून एमआयडीसीमार्गे मालवण व वेंगुर्ला या दिशेने वळविण्यात येणार आहे.
 तसेच मालवण-कुडाळ मार्गावरील अवजड वाहतूक नेरूर जकात नाका–छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमआयडीसी)–हॉटेल अन्नपूर्णा–विनायक सुझुकी शोरूम–हॉटेल सदिच्छा–एस. एन. देसाई चौक–राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या मार्गाने वळविण्यात येणार आहे.
   या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी; सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
   अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते तसेच पर्यायी मार्ग नागरिकांना स्पष्टपणे समजावेत यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेतचिन्हे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक कोंडी अथवा अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने चोख     नियमन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
   आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!