नाईक बंधूंवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःचे अस्तित्व आणि पक्षातील दुफळी सांभाळा

वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांचा भाजपा तालुकाध्यक्ष व सभापतींवर जोरदार पलटवार

महागाई आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काढलेल्या विराट जनआंदोलनाने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनआंदोलनाच्या धसक्याने बावचळलेल्या भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे आणि सभापती सिद्धेश रावराणे यांनी नाईक बंधू व शिवसेनेवर केलेली बालिश विधाने म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. असा जोरदार पलटवार शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नंदू शिंदे यांनी केला आहे.
​या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना नंदू शिंदे यांनी भाजपाच्या दोन्ही नेत्यांचे वाभाडे काढले. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले सुधीर नकाशे स्वतःच्याच गावात उघडे पडले; आधी गाव सांभाळा. शिवसेनेला ‘बचत गट’ म्हणून हिणवणाऱ्या सुधीर नकाशे यांना विसर पडला असावा की, ज्या शिवसेनेच्या बळावर ते एकेकाळी जिल्हा परिषद निवडणूक जिंकले होते, त्याच शिवसेनेचे व त्या बचत गटाचे ते स्वतः लाभार्थी आहेत.
​नाधवडे MIDC वरून पळता भुई थोडी: ज्या MIDC च्या नावावर नकाशे यांनी वर्षानुवर्षे वैभववाडीकरांची दिशाभूल केली, त्या नाधवडे गावातील प्रस्तावित MIDC ला त्यांच्याच गावातून ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. स्वतःच्या गावातील जनतेचा विश्वास संपादन न करता आल्यामुळे पालकमंत्र्यांवर MIDC ची जागा बदलण्याची नामुष्की ओढवली. स्वतःच्या गावात काय चालले आहे याचे भान नसलेल्या अध्यक्षांनी शिवसेनेवर बोलू नये.
​भाजपातील दुफळी चव्हाट्यावर, नुकत्याच झालेल्या परिवहन विभागाच्या बैठकीवेळी वैभववाडी तालुक्यात भाजप अंतर्गत झालेल्या दोन वेगवेगळ्या बैठका संपूर्ण तालुक्याने पाहिल्या आहेत. स्वतःचा पक्ष आणि कार्यकर्त्यांना सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांना सल्ले देऊ नयेत.
​२. ‘वैभववाडीत ५०% पदे रिक्त’; पालकमंत्र्यांचा आणि सभापतींचा विकास कागदावरच!
​नाईक बंधूंनवर टीका करनाऱ्या सभापती महोदयांनी आणि तालुका अध्यक्ष नकाशे यांनी आधी वैभववाडीच्या शासकीय कार्यालयांची विदारक सत्यस्थिती पाहावी:
​पंचायत समिती: एकूण ६९ मंजूर पदांपैकी तब्बल ३५ पदे रिक्त आहेत!
​शिक्षण विभाग: शाळांमध्ये १ पदवीधर आणि ३९ उपशिक्षक अशी एकूण ४० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ३ विस्तार अधिकारी व १ कनिष्ठ सहाय्यक पद रिक्त असून गटशिक्षणाधिकारी पदही पूर्णवेळ नसून अतिरिक्त प्रभारावर सुरू आहे.
​पशुधन विभाग: पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या ८ पैकी ७ पदे रिक्त आहेत. परिचर (MPW) ची ९ पैकी ८ पदे रिक्त असून तालुका दुग्ध व्यवसाय अधिकारी पदही रिक्त आहे.
​आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय: आरोग्य विभागात मंजूर ६७ पदांपैकी ३२ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि दंत शल्यचिकित्सक अशी महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत.
​कृषी व MSEB: कृषी विभागातील ५० पैकी २७ पदे रिक्त आहेत. MSEB मध्ये लाईनमन आणि तंत्रज्ञांची इतकी भीषण टंचाई आहे की एका तंत्रज्ञाकडे ३-३ गावांचा कारभार सोपवून ग्राहकांना अंधारात ठेवले जात आहे.
​तालुक्यातील सर्वच विभागांत ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त ठेवून जनतेला वेठीस धरणारे शासन काय विकास करत आहे?
​३. गॅस सिलिंडर व पेट्रोल पंप: राणे कुटुंबीयांना मोफत पेट्रोल देण्याचा सल्ला देणार का?
​सुशांत नाईक यांच्या गॅस एजन्सीचा संदर्भ देत त्यांना सवलतीत गॅस देण्याचे आव्हान देणाऱ्या सभापतींनी स्वतःच्या नेत्यांकडे बघावे. “राणे कुटुंबीयांचेही पेट्रोल पंप आहेत, मग सभापती महोदय राणे कुटुंबीयांना जनतेला सवलतीच्या दरात पेट्रोल विकायला सांगणार का?” असा थेट सवाल नंदू शिंदे यांनी उपस्थित केला.
​४. नाईक बंधूंच्या विजयावरून पालकमंत्र्यांच्या ताकदीवरच प्रश्नचिन्ह!
​नाईक बंधू हे कणकवलीत निलेश राणे यांच्या मदतीने निवडून आले असा दावा करून सभापतींनी एकप्रकारे स्वतःच्याच पालकमंत्र्यांची कणकवलीत ताकद नाही, हेच जाहीरपणे मान्य केले आहे.नाईक बंधू हे गेली 20 वर्षे कणकवली नगरपरिषद मध्ये निवडून जात आहेत याची माहिती सभापती यांना नाही का?
​जनतेचा आवाज दडपता येणार नाही!
​”ऐन सणासुदीत महागाईने होरपळणाऱ्या आणि स्मार्ट मीटरच्या दडपशाहीने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि नाईक बंधू भक्कमपणे उभे आहेत. म्हणूनच मोर्चाला मिळालेल्या विराट प्रतिसादाने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. रिकाम्या खुर्च्या आणि रिक्त पदांवर चालणाऱ्या कारभारावर आधी सत्ताधाऱ्यांनी बोलावे, जनतेला न्याय द्यावा आणि मगच शिवसेनेवर टीका करण्याची हिंमत दाखवावी,” असा सज्जड इशारा तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!