रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर अखेर रेलिंगचे काम सुरू

शिवसेना स्टाईलच्या दणक्यानंतर सा. बां. ला जाग
कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक पुलाला तात्काळ रेलिंग बसविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर पुलावरील रेलिंगचे काम शुक्रवारपासून प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
या पुलावर रेलिंग नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिसाळ यांना घेराव घालत जाब विचारला होता.
यानंतर उपअभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे शुक्रवार रोजी रेलिंगचे साहित्य साईटवर दाखल झाले असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
दरम्यान, रेलिंगचे साहित्य साईटवर दाखल होताच शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली. तसेच पुलावरील रेलिंगचे काम दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीनेच झाले पाहिजे, अशा सक्त सूचना संबंधितांना दिल्या.
यावेळी गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, प्रथमेश केळबाईकर, अभियंता ईश्वर बामणे, राजाराम गडेकर, संदेश सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






