आंबोली-सांगेलीच्या सह्याद्री रेस्क्यू पथकाची शर्थीची मोहीम

४०० फूट दरीतून बेपत्ता तरुणाचा मृतदेह बाहेर

स्वप्नवेल पॉईंट, तिलारी कॅनाल परिसरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर ४०० फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. गुरुवारी (३ सप्टेंबर) सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या रेस्क्यू पथकाने तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.
हर्षद प्रकाश हुंदळेकर (रा. पाटणे फाटा, जंगमटी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हर्षद गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असताना स्वप्नवेल पॉईंट, तिलारी कॅनाल परिसरातील सुमारे ४०० फूट खोल दरीत तो मृतावस्थेत आढळून आला.
दरीची खोली, अवघड भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गम ठिकाण यामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान रेस्क्यू पथकासमोर होते. मात्र, सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपच्या रेस्क्यूअर्सनी नऊ तास अथक प्रयत्न करत अखेर मृतदेह सुरक्षितपणे दरीबाहेर आणला.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बाबल आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, अजित नार्वेकर, प्रतीक मोहिते, संतान आल्मेडा, राजू राऊळ, नारायण चव्हाण, मनेश नार्वेकर, अजित गावडे, सर्वेश नाईक, आनंद नार्वेकर, गुरुनाथ सावंत आणि राकेश गावडे यांच्यासह चंदगड येथील श्रीपाद सामंत, विशाल परब आणि साई गोसावी यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!