कणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचा प्रस्ताव

कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचा धडाकेबाज निर्णय

अजून दोन दारू विक्रेत्यांवर तडीपरीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू

अवैध धंद्याच्या विरोधात कणकवली पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेबद्दल होतेय जनतेतून समाधान व्यक्त

गेली अनेक वर्ष सातत्याने अवैध दारू विक्री बाबतचे गुन्हे दाखल करून देखील अवैध दारू विक्री बंद न करता तसेच याबाबतच्या वर्तनात सुधारणा न केल्याने कणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तडीपरीचा प्रस्ताव कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. तर अजून दोन अवैध दारू विक्रेत्यांचे प्रस्ताव तडीपारच्या प्रक्रियेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कमलेश बच्छाव यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ते चर्चेत आले असतानाच आता अवैध दारू विक्रेत्यांच्या बाबतीत त्यांनी उचललेले हे पाऊल हे या कारवाई मधील महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कणकवली तालुक्यात काही अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्याने काही महिन्यांच्या फरकाने अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल होत असताना केवळ गुन्हे दाखल करून यापूर्वीच्या काही अधिकाऱ्यांकडून फॉर्मलिटी चा प्रकार केला जात होता. परंतु अवैध दारू विक्रीची पाळेमुळे समूळ उच्चाटन करण्यासाठी काही कायद्यातील तरतुदींचा वापर करण्याचे अधिकार हे पोलीस प्रशासनाला असतात. याची चुणूक कणकवलीचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी दाखवून दिली आहे. कणकवली तालुक्यातील काही महत्त्वाची नावे ही सातत्याने अवैध दारू विक्री प्रकरणात समोर येत असतात. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश असतो. दारू विक्रीच्या गुन्ह्यामध्ये सहज जामीन मिळवता येतो याची कल्पना या संशयित आरोपींना असल्याने त्यांच्याकडून वारंवार गुन्हे दाखल होऊन देखील दारू विक्री केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या निदर्शनास आले होते. कणकवली तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत असताना अवैध दारू विक्री बाबत कडक भूमिका घेण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक बच्छाव यांनी घेतला व त्याचाच एक भाग म्हणून कणकवली तालुक्यातील तब्बल पाच अवैध दारू विक्रेत्यांचे तसेच एक घरगुती वादातून सातत्याने गुन्हे दाखल असलेल्या एकावर असे एकूण 6 जणांचे तडीपरीचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांजवळ पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान अजून दोन अवैध दारू विक्रेत्यांच्या तडीपरीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार असून, या प्रस्तावांवर प्रांत अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेतल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या तडीपरीच्या प्रस्तावामध्ये सदर अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांकडून करणाऱ्यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपरीसाठी प्रस्तावित करण्यात आल्याने कणकवली तालुक्यातील या अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या वर्तुळात एकच मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या या धडाकेबाज निर्णयाबद्दल त्यांचे सर्व सामान्य जनतेतून कौतुक केले जात आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!